www.24taas.com, झी मीडिया, पुणे
`उध्दव साहेबांच्या फोटोग्राफीच्या छंदावर काही लोक बोलतात. मात्र, तुमच्या रात्रीच्या छंदाचे काय?`, असा जोरदार हल्ला शिवसेनेचे सचिव आदेश बांदेकर यांनी विरोधकांवर चढवला आहे. हे बोलताना बांदेकर यांचा रोख मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर होता. महायुतीत मावळ लोकसभेचे शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी आदेश बांदेकर यांनी सभा घेतली.
`शिवसेनेच्या जिवावर मोठे झालेल्या काही लोकांनी नंतर शिवसेना सोडली. त्यांचा बंदोबस्त शिवसेनानंतर करेल. मतभेद, तुटीफुटीचा राजकारणाचा डाव आणि आर्थिक प्रलोभने दाखवली जातील. परंतु, त्यांना बळी न पडता फक्त शिवसेनेच्या धनुष्यबाणावरच लक्ष ठेवा. तसेच महागाई, भ्रष्टाचार आणि स्त्रियांना समाजात असुरक्षितता निर्माण करणा-या रावणांना येणाऱ्या निवडणुकीत गाडून टाका`, अशी सादही यावेळी आदेश बांदेकर यांनी मतदारांना घातली.
फक्त आवाज आणि नुसताच धूर काही पक्ष सोडत आहेत. त्या धुरातच त्यांचा पक्ष आणि त्यांचे नेते गुदमरायला लागले आहे. पण शिवसेनेच्या उमेदवाराचे चारित्र्य, हे एखाद्या काचेप्रमाणे पारदर्शक आहे. हिंदुत्वाचा भगवा हा शिवसेनेकडे आहे. शिवसैनिकच नजरेला नजर भिडून उत्तर देऊ शकतो, असं म्हणत शिवसेनेच्याच उमेदवाराला प्रचंड मतांनी निवडून देण्याच आवाहन त्यांनी मतदारांना केलं.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.