www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राचा जावई टीएमसीच्या तिकिटावर पश्चिम बंगालच्या दार्जिलिंग मतदारसंघातून आपलं राजकारणातील नशिब आजमावतोय. हा महाराष्ट्राचा जावई म्हणजेच फुटबॉलपटू बायचुंग भुतिया... मराठमोळी पत्नी माधुरी टिपणीस हिच्या खंबीर पाठिंब्यामुळेच आपण हे पाऊल उचलू शकलो, असं बायचुंगनं म्हटलंय.
बायचुंग भुतिया याची पत्नी म्हणजे माधुरी टिपणीस मूळ महाराष्ट्रीयन... माजी हवाईदलप्रमुख ए. वाय. टिपणीस यांची माधुरी ही पुतणी... बायचुंगसोबत माधुरीची भेट झाली सिक्कीमला... १९९७ साली... आपल्या कुटुंबीयांसोबत फिरायला गेलेल्या माधुरीचं मनात भरून राहिला तो अचानक भेटलेला बायचुंग... भेट, मैत्री, प्रेम आणि कुटुंबीयांचा विरोध स्वीकारून लग्नाचा निर्णय इथपर्यंत या जोडीचा झालेला प्रवास... एकमेकांची भेट झाल्यानंतर तब्बल सात वर्षांनी म्हणजे ३० डिसेंबर २००४ ला माधुरी आणि बायचुंग विवाहाच्या बेडीत अडकले. बायचुंगच्या टिंकीटम (सिक्कीम) गावातच त्यांचा धूमधडाक्यात विवाह झाला. माधुरीच्या कुटुंबीयांचा या लग्नाला सुरुवातीला विरोध होता. मात्र, तो नंतर मावळला. आता, या जोडप्याला एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन जुळी अपत्यही आहेत.
माधुरी घरी आपल्या मुलांसोबत मराठीतूनही बोलते... आणि बायचुंग आपल्या सिक्कीमच्या ग्रामीण भाषेत... त्यामुळे त्यांच्या मुलांना आता दोन्हीही भाषा समजायला लागल्यात... पण, बायचुंगच्या मात्र मराठी अजूनही डोक्यावरूनच जाते.
खरं म्हणजे, फुटबॉलप्रेमींशिवाय इतर जनमानसात बायचुंगची ख्याती पोहचली ती छोट्या पडद्यावरील `झलक दिखला जा` या डान्स शोमुळे... या कार्यक्रमात जिंकलेली बक्षिसाची रक्कम त्यानं सामाजिक कार्यासाठी दान केली.
आपण आज जिथंवर पोहचलोय तिथपर्यंत पोहचण्यासाठी माधुरीची आपल्यासोबत असलेली साथ खूप महत्त्वाची होती, असं बायचुंग आवर्जुन सांगतो... आणि म्हणूनच स्वत: हॉटेल व्यावसायिक असलेल्या आपल्या पत्नीचं - माधुरीचं नाव बायचुंगनं आपल्या हातावरदेखील गोंदवलंय. आपल्यापेक्षा उच्चभ्रू घरातून आलेल्या माधुरीनं आपल्या खेळांना आणि छंदांना आपलंसं केलं आणि प्रत्येक वेळी आपल्याला पाठिंबा दिला... राजकारणाच्या वाटेवरही माधुरीचीच साथ आहे, म्हणून आपण या वाटेवर पाऊल टाकल्याचं बायचुंगनं म्हटलंय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.