www.24taas.com, झी मीडिया, नाशिक
नाशिक लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेन हेमंत गोडसे यांच्या नावाची घोषणा केल्यानं गेल्या आठ दिवसांपासूनची शिवसैनिकांमधली संभ्रमावस्था थांबलीय. मनसेच्या उमेदवाराचं नाव अद्याप गुलदस्त्यात असल्यानं एकाच ‘राज’ बाकी मैदानात अशी काहीशी परिस्थितीत नाशिक मतदार संघाची झालीय. गोडसे यांचा थेट सामना जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ आणि मनसेच्या उमेदवाराविरोधात होणार असल्यानं निवडणुकीत चांगलीच चुरस बघायला मिळणार आहे.
नाशिकमध्ये शिवसेसनेनं हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर करताच त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं. मागच्या लोकसभा निवडणुकीत मनसेकडून निवडणूक लढवणाऱ्या गोडसेंचा थोडक्यात पराभव झाला होता. आता ते शिवसेनेच्या तिकीटावर छगन भुजबळ यांना आव्हान देणार आहेत. मागच्या निवडणुकीतल्या पराभवाचा वचपा यंदा काढू असा विश्वास गोडसेंनी व्यक्त केलाय.
हेमंत गोडसेंना ही निवडणूक सोपी नाही असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे. भुजबळ यांच्या नावाचा प्रभाव सातत्यानं आरोप होत असले तरी त्यांनी दृष स्वरुपात केलेला जिल्ह्याचा विकास दुर्लक्षित करता येणारं नाही. मागच्या लोकसभा निवडणुकीत जात फॅक्टरचा फायदा गोडसेंना झाला होता. मात्र आता भुजबळ यांच्या विरोधात हेमंत गोडसे, बसपचे दिनकर पाटील आणि मनसेचे संभाव्य उमेदवार म्हणून बघितले जाणारे प्रदीप पवार असे तीन उमेदवार असल्यानं मराठा मतांचं विभाजन होणार हे निश्चित. त्यातच भ्रष्टाचाराचा सफाया करण्यसाठी हातात झाडू घेऊन तयार असणारे विजय पांढरे आणि डाव्या आघाडीचे तानाजी जायभावे यांच्याकडेही दुर्लक्ष करता येणारं नाही.
गेल्या निवडणुकीत मनसेत असलेले हेमंत गोडसे यांनी यंदा धनुष्यबाण हाती घेतलाय. महापालिकेतल्या असमाधानी कारभारामुळं मनसेलाही ही निवडणूक सोपी नाही. तर कायमच वादात आणि चर्चेत राहणाऱ्या भुजबळांना मित्र पक्षातले नेते किती साथ देतात यावर बरेच काही अवलंबून आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.