www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
अभिनेता नाना पाटेकर उत्तर मध्य मुंबईतून भाजपच्या तिकीटावर लोकसभा लढविण्याची शक्यता असल्याचे वृत्त स्वतः नाना पाटेकर यांनी फेटाळून लावले आहे. मला राजकारण झेपणार नाही आणि राजकारण्यांना मी झेपणार नाही, अशी रोखठोक प्रतिक्रिया नाना पाटेकर यांनी झी मीडियाशी बोलताना दिली.
नाना पाटेकर हे भारतीय जनता पक्षाकडून खासदार प्रिया दत्त यांना आव्हान उभे करण्याची शक्यता असल्याचे वृत्त काही प्रसारमाध्यमांनी प्रसिद्ध केले होते. त्यावर आम्ही थेट नाना पाटेकर यांच्याशी संपर्क साधला. त्यावर त्यांनी हे वृत्त खोटे असल्याचे सांगितले.
अंधेरी, जुहू या परिसरात बॉलिवूडची मंडळी राहत असलेल्या मतदारसंघातून प्रिया दत्तच्या विरोधात नानाला उभे करण्यात येणार आहे. स्थानिक पातळीवरून नानाची शिफारस केंद्रीय पातळीवर केलेली आहे आणि लवकरच तेथून नानाच्या नावाची घोषणा होणार असल्याचे वृत्त होते. पण स्वतः नाना पाटेकर यांनी या वृत्ताचे खंडन केले आहे.
गेल्या लोकसभा निवडणुकीत प्रिया दत्तच्या विरोधात भाजपचे नेते महेश जेठमलानी यांनी निवडणूक लढविली होती. मात्र त्यांचा कसलाही निभाव लागला नाही. प्रिया दत्त दिवंगत खासदार व अभिनेते सुनील दत्त यांची मुलगी आहे. सुनील दत्तबाबत बॉलिवूडमध्ये आदराचे स्थान होते आणि आजही आहे. त्यामुळे त्यांच्या नावावर प्रिया दत्त मुंबईतून सहज निवडून येते असा अनुभव आहे.
त्याआधी भाजपने अभिनेता अनुपम खेर यांच्याकडे विचारपूस केली होती. मात्र, खेर यांनी नकार दिला होता. दरम्यान, खेर यांना आपकडून उमेदवारीसाठी विचारपूस होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.