सुशीलकुमारांचं `दादां`वर वक्तव्य, कलाकारांकडून निषेध

"नरेंद्र मोदी दादा कोंडके यांच्यापेक्षा थापाडे आहेत" या केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या वक्तव्यावर कलाकार, तंत्रज्ञ यांनी वैयक्तिक पातळीवर निषेध नोंदवण्यात येतोय.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Apr 15, 2014, 12:16 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, सोलापूर
"नरेंद्र मोदी दादा कोंडके यांच्यापेक्षा थापाडे आहेत" या केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या वक्तव्यावर कलाकार, तंत्रज्ञ यांनी वैयक्तिक पातळीवर निषेध नोंदवण्यात येतोय.
दादांचे चारित्र्य, चांगुलपणा, प्रामाणिकपणाचा शिंदे यांनी उपमर्द केला आहे. कलाकारांचे नेते असलेल्या दादांचा अपमान म्हणजे कलाकारांचा अपमान असल्याची प्रतिक्रिया दादांच्या प्रत्येक चित्रपटात कलाभिनय घडविणारे भालचंद्र कुलकर्णी यांनी व्यक्त केली आहे.
पंढरपूर इथं झालेल्या सभेत सुशीलकुमार शिंदे यांनी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींवर टीका करण्याच्या प्रयत्नात मोदींना दादा कोंडके यांची उपमा दिली आहे. दादांपेक्षाही मोदी थापाडे आहेत असं विधान त्यांनी केलं. दादा कोंडके यांना थापाडे ठरवण्याच्या शिंदे यांच्या वक्तव्यानं चित्रपटसृष्टीला धक्का बसला आहे. एकेकाळी राज्याचे सांस्कृतिक खातं हाताळलेल्या एका नामवंत कलाकाराचा उपमर्द केल्याची भावना कलाकार, तंत्रज्ञांमध्ये निर्माण झाली आहे.
मराठी चित्रपटसृष्टीचे नाव गिनिज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदविणाऱ्या दादांच्या चित्रमय कर्तृत्वाला बाधा आणल्याची प्रतिक्रिया मराठी चित्रपटसृष्टीचं माहेरघर असलेल्या करवीरनगरीत उमटली आहे. `वारसा दादा कोंडके` यांचा या पहिल्या मराठी टीव्ही टॅलेंट शोचे विजेते नितीन कुलकर्णी म्हणाले, शिंदेंसारख्या जाणकारांनी दादांच्या बाबतीत चुकीचे विधान करायला नको होतं. यामुळं समस्त कलाकारांचा अपमान झाल्याची प्रतिक्रिया नोंदविली.
नरेंद्र मोदी, दादा कोंडके या भिन्न क्षेत्रातील उच्चतम दर्जाच्या व्यक्ती असताना त्यांची तुलना कशासाठी असा प्रश्न उपस्थित केला आहे. क्षणिक प्रसिद्धिलोलुपतेसाठी कोपरखळी मारली तरी कोपरातून आलेले ढोपर पोटात खुपते याचा विसर पडता कामा नये असा कोल्हापुरी टोला त्यांनी लगावला आहे. दादांच्या `थापाडय़ा` चित्रपटाचा उल्लेख आता झाला असला तरी उद्या त्यांच्या चित्रपट नामावलीप्रमाणे आली अंगावर, बोट लावीन तिथं गुदगुल्या असा शब्दप्रयोगही शिंदे करतील का याची भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे.
दादांसमवेत एकूण एक चित्रपटांत काम केलेले भालचंद्र कुलकर्णी यांनी शिंदे यांच्या वक्तव्यानं मनस्वी दु:ख झाल्याचं म्हटलं आहे. चित्रपटसृष्टीविषयी शिंदे यांचं मत चांगलं असतानाही त्यांनी असं विधान करायला नको होतं. दादांनी कधीही थाप मारली नाही. व्यवहारानं चोख असलेल्या दादांच्या वागण्यात खोटारडेपणा नव्हता. मोदींविषयी शिंदेंना जी टीका करायची ती ते करू शकतात. पण दादांसारख्या प्रामाणिक व्यक्तीला त्यामध्ये गोवून तशी उपमा देणं हा बालिशपणा आहे, अशी टीका त्यांनी केली.
अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे उपाध्यक्ष दत्तप्रसाद अष्टेकर यांनी कलाकार हा कोणाच्या अध्यातमध्यात नसताना राजकारणासाठी त्याला गोवणे चुकीचे असल्याचे नमूद करून विधानाचा वैयक्तिक पातळीवर निषेध नोंदविला. दादांसारख्या अष्टपलू कलाकाराचा वापर टीकेसाठी करणे योग्य नसल्याचे मत महामंडळाचे सचिव सुभाष भुर्के यांनी व्यक्त केले आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.