मुंबई : एकूण कर्करोगग्रस्त महिलांपैकी ४६ टक्के महिला या ५० वर्षांखालील वयाच्या असल्याचे आढळून आले आहे. सतत बदलत्या आणि धकाधकीच्या जीवनशैलीमुळे महिलांमध्ये कर्करोगाचे प्रमाण वाढत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
उशिरा लग्न करणे, एकापेक्षा अधिक पुरूषांशी शरीरसंबंध ठेवणे किंवा उशिरा गरोदर राहणे यांसारख्या गोष्टीही कर्करोगवाढीसाठी कारणीभूत आहेत. 25 ते 40 वयोगटातील रूग्णांचे प्रमाण सध्या वाढत असून ही धोक्याची घंटा असल्याचे इंद्रप्रस्थ अपोलोचे सीनियर कन्सल्टंट डॉ. समीर कौल यांचे म्हणणे आहे.
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कॅन्सर प्रिव्हेंशन अँड रिसर्चच्या रिपोर्टनुसार गर्भाशयाच्या कर्करोगामुळे भारतात दर आठ मिनिटांना एका महिलेचा मृत्यू होतो. त्यामुळे कोणतीही जखम, खोकला, ताप, रक्तस्त्रावातील बदल या गोष्टींसाठी महिलांनी तत्काळ उपचार घेणे गरजेचे आहे. यामुळे कर्करोगाचा धोका कमी करता येऊ शकतो.