www.24taas.com, नवी दिल्ली
वारंवार होणाऱ्या भ्रष्टाचारांच्या आरोपांमुळे काँग्रेसची अवस्था बिकट होत असल्याचं दिसू लागलंय. केजरीवालांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळं कोंडीत सापडलेल्या केंद्रीय कायदामंत्री सलमान खुर्शीदांचा संयम अखेर सुटला. नेहमी अहिंसेची भाषा करणारे कायदेमंत्री सलमान खुर्शीद यांनीच केजरीवालांना धमकी देत रक्तपाताची भाषा केली आहे.
केजरीवाल यांनी फारुखाबादमध्ये येऊनच दाखवावे ते परत जाणार नाहीत अशी धमकीच सलमान खुर्शीद यांनी दिली आहे. पेन चालवणारे हात रक्ताने माखतील असंही खुर्शीद यांनी म्हटलंय. पाच प्रश्न विचारणारे, प्रश्न विचारणंच विसरुन जातील असं सलमान खुर्शीद यांनी म्हटलंय.
काय़दामंत्री सलमान खुर्शीद यांची भाषा अशोभनीय असल्याचं सांगत अरविंद केजरीवाल यांनी खुर्शीदांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलय. मला मारुन प्रश्न सुटणार नाही, भ्रष्टाचाराविरोधात संपूर्ण देश जागा झाला आहे, एक अरविंद मेला, तर १०० अरविंद उभे राहतील, असं त्यांनी म्हटलंय. धमकी देण्यापेक्षा भ्रष्टाचाराविरोधात ठोसं पावलं उचला, असा सल्लाही त्यांनी काँग्रेसला दिलाय.