नवी दिल्ली : एकेकाळी स्वत:ला अमिताभ बच्चन यांचा भाऊ म्हणवून घेणारे अमर सिंह सध्या बच्चन कुटुंबीयांशी खूपच नाराज आहेत. आज आपण नसतो तर संपूर्ण बच्चन कुटुंबीय तुरुंगात असतं, असंही अमर सिंह यांनी म्हटलंय.
अमिताभ बच्चन यांनी आपल्या सत्तराव्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या पार्टीत स्पॉटबॉईजनादेखील बोलावलं होतं, पण यामध्ये अमर सिंह यांना बोलावण्यात आलं नव्हतं.
समाजवादी पार्टीचे माजी नेते अमर सिंह यांच्या म्हणण्यानुसार, अमिताभ त्यांच्या सिनेमाच्या नावाप्रमाणे 'बागवान' नाहीत तर 'बाग उजाड' आहेत.
जया बच्चन यांना राज्यसभेची जागा मिळाल्यानंतर अमरसिंह आणि अमिताभ यांच्या नात्यात कटुता यायला सुरुवात झाल्याचं म्हटलं जातं. पण, अमर सिंह यांच्या म्हणण्यानुसार अनिल अंबानी यांच्या घरी झालेल्या पार्टीत अमिताभ यांनी केलेल्या वक्तव्यामुळे हा दुरावा निर्माण झालाय. अमर सिंह यांच्यामुळे बच्चन कुटुंबीयांना सहारा बोर्डातून बाहेर पडावं लागलं, असा अमिताभ यांनी या पार्टीत आरोप केला होता.
पण, मी सहारा बिझनेसंबंधी अमिताभ बच्चन यांना सूचित केलं नसतं तर आज त्यांचं संपूर्ण कुटुंब सहारा बोर्डात सामील असतं आणि आज इतरांप्रमाणे तेही तुरुंगात असते... आणि मग ते आज ना पंतप्रधानांसोबत फोटो सेल्फी काढू शकले असते ना गिरच्या जंगलांना प्रमोट करू शकले असते, असं अमर सिंह यांनी म्हटलंय.
अमर सिंह हे सध्या खासदार नाहीत. त्यामुळे, लवकरच त्यांना दिल्लीत मिळालेलं सरकारी निवस्थान '२७, लोधी इस्टेट' रिकामं करायचंय. त्यामुळे त्यांचं सामान दिल्लीतल्या छतरपूर स्थित फॉर्महाऊसवर शिफ्ट केलं जातंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.