www.24taas.com, राळेगणसिद्धी
पाकिस्तानच्या सैन्याकडून भारतीय जवानांची हत्या झाल्यानं अण्णा हजारे संतापले आहेत. पाकिस्तानला 1965च्या युध्दाचा विसर पडल्याचं अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे. वयाच्या 75व्या वर्षीही आपण सीमेवर लढण्यास तयार असल्याचं अण्णांनी म्हटलं आहे.
पाकिस्तानी सैनिकांचे कौर्य गेल्या दोन दिवसांत पुन्हा एकदा दिसून आले. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारतीय हद्दीत ६०० मीटरपर्यंत घुसखोरी करून पाकिस्तानी सैनिकांनी केलेल्या हल्ल्यात दोन जवान शहीद झाले. पाक सैनिकांनी जवानांची गळा कापून हत्या तर केलीच, शिवाय एकाचे मुंडके त्यांनी सोबत नेल्याचेही वृत्त आहे. अन्य दोन जवान जखमी झाले आहेत.
या बातमीवर प्रतिक्रिया देताना अण्णा हजारे चांगलेच संतापले. देशातील भ्रष्टाचाराविरुद्ध लढणाऱ्या अण्णा हजारेंना पुन्हा सीमेवर जाऊन लढण्याचे अवसान आले आहे. तरुण वयात अण्णा हजारे यांनी भारतीय लष्करात नोकरी केली होती. १९६५ सालच्या भारत-पाक युद्धात अण्णा लष्कराचा ट्रक चालवत होते. त्यामुळे अण्णांनी युद्धकाळ स्वतः सीमेवर राहून अनुभवला होता. त्यामुळेच दोन भारतीय सैनिक शहीद झाल्याचं कळताच अण्णांमधील सैनिक पुन्हा लढण्यासाठी पेटून उठला.