www.24taas.com, नवी दिल्ली
बलात्कारविरोधी बिल लोकसभेत मंजूर झालंय. हे बिल आज राज्यसभेत सादर करण्यात येणार आहे. मंगळवारी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी हे बिल लोकसभेत मांडलं.
या नव्या कायद्यानुसार संमतीनं शारीरिक संबंध ठेवण्याचं वय अठराच असेल पण जर एखाद्या मुलानं अठरा वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलीशी शारीरिक संबंध ठेवले आणि तक्रार करण्यात आली तर त्या मुलाला इशारा देण्यात येईल. परंतू, दुसऱ्या वेळी अशाच प्रकारची तक्रार झाली तर त्याला कायद्यानुसार शिक्षा करण्यात येईल. महिलांकडे रोखून पाहणे, लपून छपून पाहणे आणि त्यांचा पाठलाग करणे हे गुन्हे जामीनपात्र असणार आहेत. हे सगळे आरोप मुलीला पुराव्यांनिशी सिद्ध करावे लागतील. महिलांना कुठल्याही ठिकाणी विवस्त्र व्हायला प्रवृत्त करणं हा गुन्हा समजला जाईल.
आज हे बिल राज्यसभेमध्ये सादर केलं जाणार आहे. राज्यसभेत संमती मिळाल्यानंतर ते राष्ट्रपतींकडे मंजूरीसाठी पाठवण्यात येईल. त्यानंतरच या बिलातील तरतूदी कायदा म्हणून अंमलात आणल्या जातील.