...तर केजरीवाल पुन्हा तुरुंगात जाणार!

नितीन गडकरी यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचे आरोप करणारे ‘आप’चे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी आरोप मागे घ्यायला नकार दिलाय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jun 6, 2014, 02:57 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
नितीन गडकरी यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचे आरोप करणारे ‘आप’चे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी आरोप मागे घ्यायला नकार दिलाय. त्यानंतर केजरीवाल यांच्यावर आरोप निश्चित करण्यात आलेत. आता गडकरी आणि केजरीवाल या दोघांमध्ये हा खटला सुरू राहणार आहे. केजरीवाल यांच्याविरोधात गुन्हेगारी बदनामी करण्याच्या कलमांखाली आरोप निश्चित करण्यात आलेत. केजरीवाल यांच्याविरोधात आरोप सिद्ध झाले तर त्यांना २ वर्षांचा कारावास होऊ शकतो.
नितीन गडकरी यांनी कलेल्या अब्रू नुकसानीच्या खटल्यात केजरीवाल आज कोर्टात हजर झाले. यावेळी कोर्टानं केजरीवाल यांना आरोप मागे घ्याला सुचवलं. मात्र, केजरीवाल यांनी नकार दिला. तुम्ही दोघेही नामवंत राजकारणी आहात, त्यामुळे एकमेकांविषयी असलेल्या मतभेदांना तिलांजली देऊन हा वेळ सकारात्मक कार्यासाठी वापरू शकता, असं कोर्टानं यावेळी नमूद केलंय. केजरीवाल यांनी आरोप मागे घेतले तर आपण केस मागे घ्यायला तयार आहोत, असं गडकरी म्हणाले. मात्र, केजरीवाल यांनी आरोप मागे घेण्यास नकार दिल्यानं आता या प्रकरणाची सुनावणी २ ऑगस्टला होणार आहे.
उल्लेखनीय म्हणजे, याच प्रकरणात पर्सनल बेल बॉण्ड भरण्यास नकार दिल्यानं अरविंद केजरीवाल यांना सहा दिवस तिहार जेलमध्ये काढावे लागले होते. गेल्या वर्षी एका जाहीर कार्यक्रमात अरविंद केजरीवाल यांनी नितीन गडकरी यांच्यासहीत अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते. यानंतर गडकरी यांनी दिल्ली पटियाला हाऊस कोर्टात केजरीवाल यांच्याविरुद्ध मानहानीची तक्रार दाखल केली होती.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.