www.24taas.com,नवी दिल्ली
पंतप्रधानांच्या निवेदनानंतरही राजीनाम्याच्या मागणीवर ठाम असल्याचं भाजपनं स्पष्ट केलय. कोळसा खाण घोटाळ्यातला पैसा काँग्रेसकडे गेल्याचा आरोप भाजप नेत्यांनी केला. सर्व कोल ब्लॉक रद्द केले जावेत. या घोटाळ्यात पंतप्रधान थेट दोषी असून नैतिकतेच्या मुद्यावर त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजप नेत्यांनी केली.
कोळसाकांडावरुन आज दिल्लीत घमासान सुरु आहे.. आणि हीच आजची लक्षवेधी बातमी आहे.. कोळसाकांडाचे आरोप निराधार सल्याचं पंतप्रधानांनी आज लोकसभेत निवेदन केलं.. मात्र विरोधक राजीनाम्याच्या मागणीवर अडून आहेत.. यातूनच संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज आजही ठप्प झालं.
त्यानंतर पत्रकार परिषद घेत भाजपनं या खाण वाटपाचा काँग्रेसला फायदा झाल्याचा रोप केलाय. तर भाजपने या आरोपाचे पुरावे द्यावेत, असा पलटवार काँग्रेसनं केलाय. काँग्रेसनं सर्व खासदारांची बैठक बोलावली असून, आता संसदेत विश्वासदर्शक प्रस्ताव मांडला जाण्याची शक्यता आहे. कोणतंही खाण वाटप रद्द करायचं नाही आणि संसदेचं अधिवेशन गुंडाळयाचंही नाही, असा आक्रमक पवित्रा काँग्रेसनही घेतलाय. भाजप संसदेत चरप्चा का करत नाही, असा सवाल चिदम्बरम यांनी केलाय.
संसदेचं कामकाज आजही पुरेसं चालू शकलं नाही. विरोधकांच्या गोंधळामुळे लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज उद्यापर्यंत तहकूब करण्यात आलंय. कोळसाकांडप्रकरणी आरोप निराधार असल्याचं सांगत, पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी आज लोकसभेत निवेदन सादर केलं. कॅगचा निष्कर्ष चुकीचा असल्याचंही त्यांनी म्हटलय. विरोधकांच्या प्रचंड गदारोळातच त्यांनी निवेदन सादर केलं. तसचं कोळसा संबंधित सर्व निर्णयांची जबाबदारी घेत असल्याचंही त्यांनी मान्य केलय.
विरोधकांकडून बचावाची संधीच दिली जात नसल्याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केलीय.. विरोधकांनी संसदेतील कामकाज होऊ द्याव, यासाठी सरकारला सहकार्य करावं, असं आवाहनही पंतप्रधानांनी केलंय. मात्र पंतप्रधान निवेदन सादर करत असताना, विरोधकांनी गोंधळ घातला. या मुद्द्यावर पंतप्रधानांनी राजीनामा द्यावा, यावर विरोधक ठाम आहेत.. त्यामुळं लोकसभेचं कामकाज काही काळासाठी तहकूब करण्यात आलं.