www.24taas.com,नवी दिल्ली
केंद्र सरकारने संमतीने शारीरिक संबंध ठेवण्याचे वय १८ वरून १६ वर आणण्यासाठी विधेयक आणलं. मात्र, खासदारांसह देशभरातून तीव्र विरोध लक्षात घेता पुन्हा १८ वर्षे करण्याचे ठरविले. परंतु १५३ वर्षांपासून संमतीने सेक्स करण्याचं वय १६ होतं, असं आता पुढे येत आहे.
१८६० मध्ये संमतीने शारीरिक संबंध ठेवण्याचे वय १६ होते, असे खुद्द केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी पोलीस खात्यातील सुधारणांवर एका परिषदेत बोलताना सांगितले. त्यामुळे १६ वय करण्यास शिंदेची ना हरकत असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसचं त्यांनी बलात्कार विरोधी विधेयकातील प्रस्तावित तरतुदीचे समर्थन केल्याचे स्पष्ट झाले आहे. संसदेने मंजूर केलेल्या या विधेयकात संमतीने शारीरिक संबंध ठेवण्याचे वय आता १८ करण्यात आले आहे.
१९६० मध्ये संमतीने शारीरिक संबंध ठेवण्याचे वय भारतीय दंड संहितेत (आयपीसी) १६ वर्ष ठेवण्यात आले होते. त्यावेळी यावर कुणीही चर्चा केली नव्हती. परंतु, यात दुरुस्ती करण्यासंदर्भात संसदेत विधेयक आल्यावर त्यावर खूप चर्चा झाली, असे शिंदे यावेळी सांगितले. दरम्यान, आयपीसी आणि इतर कायद्यांमधील काही तरतुदींचा विचार केल्यास त्यात विसंगती नसावी, असेही शिंदे म्हणाले.