www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
राजधानी दिल्लीसह उत्तर भारतात पुन्हा एकदा भूकंपाचे तीव्र धक्के बसले. भूकंपाच्या तीव्र झटक्यांनी दिल्लीसह उत्तर भारतही हादरला. रिश्टर स्केलवर ५.८ इतकी भूकंपाच्या तीव्रतेची नोंद करण्यात आली आहे. भूकंपाच्या धक्क्याने किश्तवाडा येथील काही घरे पडली असल्याची माहिती मिळते आहे.
भूकंपाचे केंद्र जम्मू-हिमाचल बॉर्डरवर असल्याचे समजते. भूकंपाचे धक्के १२ वाजून २७ मि. बसले. भूकंपाचे धक्के पंजाब, हिमाचल, जम्मू-काश्मिर आणि दिल्ली मध्येही जाणवले. तसेच पाकिस्तानमधील अनेक शहरातही भूकंपाचे धक्के बसले आहेत.
हिमाचलमधील अनेक जिल्ह्यात भूकंपामुळे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे. मात्र नुकसान कोणत्या स्वरूपात झाले आहे याची माहिती सध्या उपलब्ध नाही. मागील १५ दिवसामधील हा तिसरा भूकंप आहे.