नवी दिल्ली : गुजरातच्या माजी राज्यपाल कमला बेनीवाल यांना मिझोरमच्या राज्यपाल पदावरून बडतर्फ करण्यात आलं. राष्ट्रपती भवनातून काल रात्री कमला बेनीवाल यांच्या बडतर्फीचा आदेश निघाला. मोदी सरकारने ज्या राज्यपालांना पायउतार होण्याचे आदेश दिले होते, त्यात कमला बेनीवाल यांच्या नावाचाही समावेश होता. दरम्यान, कमला बेनीवाल यांना बडतर्फ करण्याच्या निर्णायावर काँग्रेसने नाराजी व्यक्त केली आहे.
मात्र त्यांनी राज्यपाल पद सोडण्यास नकार दिला होता. त्यामुळेच गुजरातमधून त्यांची मिझोरम येथे बदली करण्यात आली. कमला बेनीवाल राज्यपाल म्हणून कमी, पण मोदींशी असलेल्या मतभेदांमुळे अधिक चर्चेत राहिल्या. मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर बडतर्फ करण्यात आलेल्या कमला बेनीवाल या दुस-या राज्यपाल ठरल्या आहेत. बेनीवाल यांच्याऐवजी विनोद कुमार दुग्गल यांना मिझोरमचा कार्यभार सांभाळण्यास सांगण्यात आलं आहे. तर दुसरीकडे सुत्रांनी दिलेल्या माहितीनूसार भाजपचे सीनिअर नेते कल्याण सिंह यांनी राज्यपाल बनण्यास होकार दर्शवला आहे.
कल्याण सिंह यांना राजस्थानचा राज्यपाल बनवले जाऊ शकते. कल्याण सिंह यांना सक्रिय राजकारणात राहायचं होतं. मात्र संघ आणि भाजपने आखलेल्या नव्या पॉलिसीनुसार पक्षात अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली यंग टीम काम सांभाळणार, तर सीनिअर लीडर्सनी राजभवन सांभाळावं असं ठरवण्यात आलं. त्यामुळेच कल्याण सिंह यांची एकूण कारकिर्द पाहता त्यांची मध्य प्रदेश अथवा राजस्थानच्या राज्यपालपदी वर्णी लागू शकते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.