नवी दिल्ली : संसदेच्या बजेट अधिवेशनाच्या तोंडावर आज झालेल्या एनडीए खासदारांच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आक्रमक पवित्रा घेतलाय. जेएनयू मुद्यावरून विरोधकांवर तुटून पडा, असं मार्गदर्शन मोदींनी यावेळी केल्याचं सूत्रांनी सांगितलंय.
जेएनयू प्रकरणात सरकारची भूमिका अगदी योग्य आहे. याप्रकरणी राहुल गांधी आणि डाव्या पक्षांवर जोरदार टीकेची झोड उठवा, असंही मोदींनी खासदारांना सांगितल्याचं समजतंय. जेएनयूचा विषय सभागृहात चर्चेला येईल, तेव्हा विरोधकांवर हल्लाबोल करा, असं बैठकीत ठरलंय. त्याशिवाय एनडीए सरकारच्या १८ महिन्यांच्या कारभारात सुरू झालेल्या योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवा, असं आवाहनही यावेळी खासदारांना करण्यात आलंय.
दरम्यान, वेमुला प्रकरणी दिल्लीचं वातावरण तापलं असताना JNUमध्येही घडामोडी घडत आहेत. देशद्रोही आंदोलन प्रकरणी वाँटेड असलेल्या उमर खालिदच्या अटकेसाठी एकीकडे कोर्टबाजी आणि कॅम्पसबाहेर पोलीस-निमलष्करी दलाचा कडक बंदोबस्त असं चित्र होतं. दिल्ली हायकोर्टामध्ये विविध याचिकांवर आज सुनावणी झाली. खालिद आणि अनिर्बन भट्टाचार्य यांनी कायद्यानुसार शरण यावं असं हायकोर्टानं म्हटलंय. त्याच वेळी JNU कॅम्पसमध्ये शिरून या दोघांना अटक करण्याचे निर्देश पोलिसांना द्यावेत, अशी मागणी करणारी याचिका हायकोर्टानं फेटाळली.
खालिदनं शरणागतीचं स्थळ आणि वेळ निश्चित करावी, अशी मागणी केली. त्याला पोलिसांनी विरोध केलाय. दरम्यान, JNU छात्रसंघाचा अध्यक्ष कन्हैय्या कुमारच्या जामिनालाही दिल्ली पोलिसांनी विरोध केलाय. आधी त्याच्या जामिनाला विरोध करणार नसल्याची भूमिका पोलिसांनी घेतली होती. मात्र आज या भूमिकेवरून पोलिसांनी घूमजाव केलं.
दुसरीकडे खालिदच्या अटकेसाठी जेएनयूबाहेर सुरक्षा व्यवस्थेत प्रचंड वाढ करण्यात आली आहे. निमलष्करी दल तैनात करण्यात आलंय. त्यामुळे जेएनयूला पोलीस छावणीचं स्वरुप प्राप्त केलंय.