नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगने शुक्रवारी चर्चा झाली. आगामी ५ वर्षांत महाराष्ट्रात २ लाख कोटी रुपयांचे रस्ते बांधण्यात येतील, अशी माहिती नितीन गडकरी यांनी यावेळी दिली.
तर पंढरपूर वारीतल्या पालखी महामार्गासाठी ६ हजार कोटी रुपये राज्य सरकारला देण्याचे आश्वासन गडकरींनी दिलं. देहू रोड ते पंढरपूर आणि आंळदी ते पंढरपूर असा ५०० किलोमीटरचा हा चौपदरी पालखी मार्ग असेल. याकरिता राज्य सरकारनं तात्काळ जमीन अधिग्रहण करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
सोबतच नागपूर-सोलापूर-रत्नागिरी या ८ हजार कोटी रुपयांच्या राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामाकरिता, राज्य सरकारने जमीन अधिग्रहण प्रक्रिया युध्द पातळीवर सुरु करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. कोकणच्या सागरी मार्गाला जागतिक दर्जाचा राष्ट्रीय महामार्ग करणार, अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली.