मलकानगिरी, ओडिसा : आपल्या आजारी पत्नीसाठी औषधासाठी पैसे नाहीत म्हणून आपल्या दोन महिन्यांच्या मुलाला अवघ्या ७०० रुपयांत विकण्याची वेळ एका पित्यावर आलीय.
जिल्हा बाल कल्याण समितीचे अध्यक्ष संयुक्त प्रधान यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरकुंडा इथले रहिवासी असलेल्या सुकुरा मुदुली आणि धुमसी मुदुली या आदिवासी दाम्पत्यावर ही वेळ आलीय. सुकुरा आणि धुमुसीनं याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात आपल्या मुलाला बाजुच्याच गावातल्या आशा या महिलेला विकलंय.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर जिल्हाधिकारी डी. प्रशांत कुमार रेड्डी यांनी जिल्हा बाल कल्याण समितीला या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले. चौकशी दरम्यान हे दाम्पत्य सरकारद्वारे आदिवासी व्यक्तींना दिल्या जाणाऱ्या कोणत्याही योजनेखाली नोंदणीकृत नव्हते, असंही समोर आलंय. त्यांना साधा बीपीएल आणि इंदिरा आवास योजनेबद्दलही माहिती नव्हती... तर या योजनेचा ते फायदा कसा घेऊ शकतील? हाही प्रश्न होताच.
दोन जून रोजी सुकुराकडे खाण्यासाठीही पैसे नव्हते तर तो पत्नीच्या औषधासाठी कुठून पैसे आणेल? त्यामुळेच, त्यांनी आपल्या मुलाला केवळ ७०० रुपयांना एका महिलेला विकून टाकलं. त्या पैशातून त्यानं आपल्या पत्नीसाठी औषधं आणि ५० किलो तांदूळ विकत आणले.
या दाम्पत्याला इंदिरा आवास योजनेखाली पक्कं घर तसंच बीपीएल आणि इतर योजनांचा लाभ मिळवून देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचं प्रधान यांनी म्हटलंय.
दरम्यान, सुकुरा आणि धुमसी यांचं बाळ मात्र अजूनही आशाकडेच आहे. सध्या, या बाळाचे खरे माता-पिता त्याचं पालन पोषण करण्यासाठी सक्षम नाहीत त्यामुळे बाळाला अजूनही दुसऱ्या महिलेच्या घरीच असल्याचं स्पष्टीकरण प्रधान यांनी दिलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.