नवी दिल्ली : दिल्लीतील आमदारांची पगारवाड होणार आहे. आमदारांचे वेतन आणि भत्ते वाढवण्याच्या प्रस्तावाला दिल्ली राज्य सरकारनं शुक्रवारी मंजुरी दिली. मुख्यमंत्री अरविंद केरजरीवाल यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
मंत्रिमंडळाच्या बैठकीत या वेतनवाढीस मंजुरी मिळाली आहे. आता नायब राज्यपालांच्या मंजुरीसाठी हा प्रस्ताव पाठविला जाईल, असे सूत्रांनी सांगितले. अर्थात, आमदारांचे वेतन आणि भत्ते नेमके किती वाढले हे सांगण्यात आलेले नाही. दरम्यान, सत्ताधारी 'आप'च्या आमदारांच्या एका गटाने जुलैमध्ये वेतनवाढीची मागणी केली होती.
दिल्लीतील आमदारांच्या मासिक वेतनामध्ये अडीच पट वाढ करण्याचा प्रस्ताव त्रिसदस्यीय समितीने दिला होता. यानुसार, सध्याच्या दरमहा ८८ हजार रुपयांऐवजी दरमहा २.१० लाख रुपये वेतन मिळण्याची शिफारस त्यात होती. आमदारांच्या मूळ १२ हजार रुपयांच्या वेतनामध्ये या समितीने तब्बल ४०० टक्के वाढ सुचविली होती. तसेच कुटुंब आणि कार्यलय चालवताना पगार कमी पडतो, असेही कारण देण्यात आले होते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.