कटरा : वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी सोयीच्या ठरणाऱ्या उधमपूर ते कटरा या रेल्वे मार्गाचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज प्रथमच काश्मीर भेटीवर आले होते. त्यांनी कटरा-उधमपूर रेल्वेला यावेळी हिरवा झेंडा दाखवला. वैष्णोदेवी यात्रेला जाणा-या यात्रेकरूंना या मार्गाची मोठी मदत होणार आहे.
कटरा येथून आज सकाळी १० वाजता नरेंद्र मोदी यांनी या मार्गावरील पहिल्या गाडीला हिरवा झेंडा दाखवला. या सेवेमुळे भाविकांना थेट वैष्णोदेवीच्या पायथ्यापर्यंत रेल्वेने पोचता येणार आहे. आतापर्यंत वैष्णोदेवीला जाणाऱ्या भाविकांना केवळ उधमपूरपर्यंतच रेल्वेने जाता येत होते. तिथून पुढला प्रवास हा बसने अथवा खासगी वाहनाने करावा लागत होता. मात्र, आजपासून सुरु झालेल्या उधमपूर ते कटरा या मार्गामुळे पायथ्यापर्यंत रेल्वेने जाणे शक्य होणार आहे.
मोदींच्या दौ-यासाठी काश्मीरमध्ये कडेकोट सुरक्षा तैनात ठेवण्यात आली आहे. मोदी भेट देणार असलेल्या शहरांमधली सर्व हॉटेल्स आणि लॉजेसची तपासणी करण्यात येत आहे. तर या शहरांची संपूर्ण नाकेबंदी करण्यात आली आहे. जागोजागी लष्कर आणि निमलष्करी दलं तैनात करण्यात आली आहे. या यात्रेदरम्यान त्यांच्या सोबत रेल्वेमंत्री सदानंद गौडाही आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.