www.24taas.com , झी मीडिया, मुंबई
नरेंद्र मोदी यांना उन्नाव किल्ल्यात सोनं असल्याचा दावा करणारे साधू शोभन सरकार यांनी पत्र लिहून मोदींवर टीका केलीय. शोभन सरकारच्या पत्राला मोदींनी ट्विटरवरुन उत्तर दिलंय.
“संत शोभन सरकार यांच्याशी लाखो भारतीयांची श्रद्धा जोडलेली आहे, मी त्यांची तपस्या आणि त्यागला नमन करतो. तसंच केंद्र सरकारला परदेशात असलेला काळा पैशाच्या बाबतीत त्यांनी श्वेतपत्रिका काढावी”, असं मोदी यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलंय.
उन्नाव इथं पडिक किल्ल्यामध्ये गाडल्या गेलेल्या खरबो रूपयांच्या सोन्याच्या खजिन्यावरून सध्या शोभन सरकार चर्चेत आलेले आहेत. त्यांनी नुकतंच नरेंद्र मोदींना एक पत्र लिहिलं. सोनं खोदकामबाबत मोदींनी आधी सर्व तपशील मिळवून अभ्यास करावा आणि मगच खोचक टीका करावी असंही शोभन सरकार यांनी म्हटलंय.
आपल्या चेन्नईतल्या भाषणात मोदींनी शोभन सरकार आणि काँग्रेसवर टीका केली होती. उन्नावमधील अशा खोदकामामुळं जगभरात भारत हा हास्यास्पद विषय झाल्याचंही मोदींनी म्हटलं होतं. भारत सरकारनं उन्नावमधील गाडलेल्या सोन्याचा शोध घेण्याऐवजी परदेशात लपवण्यात आलेल्या काळ्या पैशांचा शोध घ्यावा असंही मोदी म्हणाले होते. मोदी यांनी शोभन सरकार यांच्यावर टीका केली होती.
भारताचं भवितव्य उज्ज्वल व्हावं यासाठी आपण स्वप्नाविषयी सरकारला सांगितलं, असं शोभन सरकार यांनी मोदींना म्हटलंय. तसंच मोदी आणि एनडीए सरकारवर त्यांनी पत्रात टीकाही केलीय. एनडीए सरकारनं बोफोर्स स्कँडलपासून ते काळा पैसा आणि बेरोजगारीबद्धल फारसं काहीच न केल्याबद्धल जबाबदार धरतं शोभन सरकार यांनी भाजपच्या इंडिया शायनिंग मोहीमेसाठी जो खर्च केला तो काळ्या पैशातून केला पांढऱ्या पैशातून? असा खोचक सवालही मोदींना विचारला.
शोभन सरकार यांच्या याच पत्रावर मोदींनी ट्वीट करुन उत्तर दिलंय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.