www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
“पहिलं लग्न झालंय आणि ते न सांगता जर दुसरं लग्न केलंत, तर दुसऱ्या पत्नीला कायदेशीर पत्नीचा दर्जा मिळून घटस्फोटानंतर तिला पोटगी मिळेल”, असा महत्त्वपूर्ण निर्णय सुप्रिम कोर्टानं दिलाय. हिंदू विवाह कायद्यानुसार अशा जोडप्याच्या मुलांनाही उदरनिर्वाह भत्ता मिळाला पाहिजे, असं कोर्टानं स्पष्ट केलंय.
मुंबईतील एका व्यक्तीनं पहिलं लग्न लपवून दुसरं लग्न केलं होतं. त्या प्रकरणी मुंबई हायकोर्टानं दुसऱ्या पत्नीला पोटगी देण्याचा आदेश दिला होता. त्या निर्णयाला सुप्रिम कोर्टात आव्हान देण्यात आलं होतं. सुप्रिम कोर्टानं त्या व्यक्तीची याचिका फेटाळत दुसऱ्या पत्नीला पोटगीचा हक्क असल्याचा निकाल दिला.
यापूर्वीच्या एका प्रकरणात दुसऱ्या पत्नीला पोटगी देण्यास सुप्रिम कोर्टानं नकार दिला होता. मात्र पहिल्या लग्नाची माहिती लपविल्यानं तो निकाल या प्रकरणी लागू होणार नाही, असं कोर्टानं म्हटलंय. न्या. रंजना प्रकाश देसाई आणि न्या. ए. के. सिक्री यांच्या खंडपीठापुढं या प्रकरणाची सुनावणी झाली. हिंदू कायद्यानुसार घटस्फोट न घेता विवाह करण्यास मान्यता नाही, पण पहिलं लग्न लपविल्यानं अशा प्रकरणात दुसऱ्या पत्नीला आणि मुलांना उदरनिर्वाह भत्ता देण्याचे आदेश कोर्टानं दिलेत.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.