नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय जनता पक्षाच्या संसदीय समितीच्या बैठकीत बोलताना माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्मदिन (25 डिसेंबर) "सुप्रशासन दिन" म्हणून साजरा करणार असल्याची घोषणा केली आहे.
येत्या 25 डिसेंबर रोजी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्मदिन आहे. याबाबत बोलताना संसदीय कार्य राज्यमंत्री राजीव प्रताप रुडी म्हणाले की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पक्षाच्या सर्व खासदारांनी 25 डिसेंबर हा माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्मदिन "सुप्रशासन दिन" म्हणून साजरा करण्यास सांगितले आहे. भाजपच्या सर्व खासदारांनी तसेच सर्व सरकारी कार्यालयांनी प्रतिकात्मक स्वरुपात सुप्रशासन दिन साजरा करावा.
मोदी यांनी सांगितले आहे की, देशभरातील भाजप प्रणित सरकारांनी तसेच सरकारी संस्थांनी त्यादिवशी सुप्रशासनाचा आदर्श म्हणून काम करावे.
तसेच सर्व भाजप खासदारांनी आपल्या मतदारसंघात एक तास "स्वच्छ भारत अभियान'' राबवावे. यावेळी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यशस्वी परदेशी भेटीबाबत बुधवारी दोन्ही सभागृहात बोलणार असल्याचेही सांगितले. तसेच संसदीय कार्यमंत्री एम.व्यंकय्या नायडू यांनी मोदी यांच्या परदेशी भेटीबद्दल अभिनंदन केले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.