50 दिवसानंतरही पैसे काढण्याची मर्यादा कायम राहणार

आठ नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाचशे आणि एक हजार रुपयाच्या जुन्या नोटा बंद करण्याचा निर्णय जाहीर केला.

Updated: Dec 25, 2016, 10:00 PM IST
50 दिवसानंतरही पैसे काढण्याची मर्यादा कायम राहणार  title=

मुंबई : आठ नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाचशे आणि एक हजार रुपयाच्या जुन्या नोटा बंद करण्याचा निर्णय जाहीर केला. या जुन्या नोटा 30 डिसेंबरपर्यंत बँकेमध्ये जमा करण्याची कालमर्यादा सरकारनं घालून दिली. हे 50 दिवस नागरिकांना त्रास होईल, यानंतर मात्र सगळं सुरळीत होईल, असं आश्वासन पंतप्रधानांनी दिलं होतं.

पंतप्रधानांनी दिलेल्या या आश्वासनावर मात्र आता प्रश्न निर्माण झाला आहे. बँकांमध्ये लागणाऱ्या रांगा आणि चलन तुटवड्यामुळे 30 डिसेंबरनंतरही पैसे काढण्यावरच्या मर्यादा कायम ठेवाव्यात अशी बँकांनी आरबीआय आणि केंद्र सरकारला केली आहे.

नोटांच्या मागणीनुसार त्याचा पुरवठा करणं आरबीआय आणि नोटा छापणाऱ्या प्रेसना अशक्य होत आहे. त्यामुळे आरबीआयही बँकांची ही मागणी मान्य करण्याची शक्यता आहे. सध्या नागरिक एटीएममधून दिवसाला अडीच हजार तर बँक खात्यामधून आठवड्याला 24 हजार रुपये काढू शकतात.