नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना भेट नाकारली आहे. ही भेट नाकारण्यामागे व्यस्तता हे कारण देण्यात आले आहे.
अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधानांची भेट मागितली होती. गेल्या १० दिवसांपासून केजरीवाल यांचे कार्यालय पंतप्रधान कार्यालयाच्या संपर्कात आहे. मात्र, पंतप्रधानांकडून केजरीवाल यांना भेटीसाठी वेळ देण्यास नकार कळवण्यात आला आहे. व्यस्त कार्यक्रमांमुळे पंतप्रधान आपणास भेटू शकणार नाहीत. आपण गृहमंत्री किंवा अर्थमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करावी, अशा प्रकारचे उत्तर पंतप्रधान कार्यालयाने दिले आहे.
दिल्लीचे नायब राज्यपाल जंग आणि केजरीवाल सरकार यांच्यात 'जंग' सुरु आहे. पर्यायाने दिल्ली सरकार आणि केंद्र सरकार यांच्यात अनेक कारणांनी 'जंग' सुरू आहे. त्यामुळे केंद्रातील 'भाजप' आणि दिल्लीतील 'आप' सरकारमधील वाद अधिक चिघळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
दिल्लीला स्वतंत्र राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीवरही केंद्राकडून 'आप'ला वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आता पंतप्रधानांनी केजरीवाल यांना भेट नाकारल्याने त्यावरून दिल्लीचे राजकारण तापण्याची शक्यता आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.