जम्मू : "पाकव्याप्त काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असून तो पाकिस्तानने अनधिकृतरित्या बळकावला असल्याचे विधान ब्रिटिश संसदेतील खासदार रॉबर्ट जॉन ब्लॅकमन यांनी केलेय. 'जम्मू प्रेस क्लब'ने मंगळवारी आयोजित केलेल्या एका परिषदेत ते बोलत होते.
"जम्मू काश्मिरचे राजे हरी सिंग यांनी स्वातंत्र्यानंतर आपले संस्थान भारतात विलीन करण्याच्या करारावर स्वाक्षरी केली होती. यानंतर पाकिस्तानने अवैधरित्या या राज्याचा काही भाग बळकावला. आता हा भाग पाकिस्तानने भारताला परत करावा," अशी मागणी ब्लॅकमन यांनी केली. ब्लॅकमन हे इंग्लंडमध्ये सत्तेत असलेल्या कंझर्व्हेटिव्ह (हुजूर) पक्षाचे नेते आणि संसदेतील खासदार आहेत.
ब्लॅकमन यांच्या मते भारत आणि पाकिस्तान या दोघांकडे आता अण्वस्त्रे असल्याने काश्मिरच्या मुद्द्यावर त्यांनी युद्ध करणे उचित ठरणार नाही. पण, पाकिस्ताननेच पुढाकार घेऊन पाकव्याप्त काश्मिरातून माघार घ्यावी आणि हा प्रदेश भारताच्या स्वाधीन करावा.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील संबंध सध्या ऐतिहासिक टप्प्यावर असून भारताच्या संर्वांगीण प्रगतीसाठी इंग्लंड पुरेपूर सहकार्य करेल, असेही ते पुढे म्हणाले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इंग्लंड दौऱ्याचे त्यांनी 'ऐतिहासिक भेट' असे वर्णन केले.
या परिषदेदरम्यान भारतीय पत्रकारांनी "इंग्लंड पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र का घोषित करत नाही?" असा प्रश्न विचारला असता "मी संपूर्ण ब्रिटिश सरकारच्या वतीने बोलू इच्छित नाही. पण, भारतात होणाऱ्या दहशतवादी कारवायांमागे पाकिस्तान असल्याची आपल्याला कल्पना आहे," असे ते म्हणाले. "दहशतवादाचा प्रतिकार करण्यासाठी इंग्लंड कायमच भारताला सहकार्य असेल असेही ते पुढे म्हणाले.