नवी दिल्ली : अलवर जिल्हा पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान किशनगड बास आणि तिजारा येथे अलवर भिवाडी महामार्गावर दीड कोटी रुपये पकडले आहेत. पोलिसांनी ३ गाड्यांमधून एक कोटी, ३२ लाख ४३ हजार रुपये जप्त केले आहेत.
पोलिसांनी या कारवाईत ५ महिला आणि १२ लोकांना ताब्यात घेतलं आहे. पकडल्या गेलेल्यो लोकांमध्ये अर्बन को-ऑपरेटीव्ह बँकेचे उपाध्यक्ष अशोक जोशी यांचा देखील समावेश आहे. हे पैसे दिल्लीला नेण्यात येत होते. कारमध्ये बॅगेत भरुन ५०० आणि १००० च्या नोटा नेल्या जात होत्या. पोलिसांना संशय येऊ नये म्हणून गाडीमध्ये महिलांना सोबत ठेवण्यात आलं होतं.
नाकाबंदी दरम्यान पोलिसांनी गाडी चेक केली. त्यामध्ये एक बॅग दिसली. पोलिसांनी जेव्हा ती बॅग उघडून पाहिली तेव्हा त्यांना देखील धक्का बसला. एक कोटी ३२ लाख आणि ४३ हजारांची रक्कम पोलिसांनी पकडली आणि त्याची माहिती आयकर विभागाला दिली. आता आयकर विभाग याची चौकशी करणार आहे.