नवी दिल्ली : राष्ट्रीय हरित लवादाने घातलेल्या बंदीच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळून लावली. राजधानी दिल्लीमध्ये १५ वर्षांहून जास्त जुनी वाहने चालविण्यावर राष्ट्रीय हरित लवादाने बंदीचा निर्णय दिला होता.
सरन्यायाधीश एल.एल. दत्तू आणि न्या. अरुण मिश्रा यांच्या खंडपीठाने या बंदीविरोधातील याचिका फेटाळली, तसेच 'राष्ट्रीय हरित लवादाला नाउमेद करण्यापेक्षा आपण सहकार्य करू या' असे म्हटले आहे. हरित लवादाचा हा निर्णय रद्दबातल ठरविण्यासाठी एका वकिलाने ही याचिका दाखल केली होती.
पेट्रोल किंवा डिझेलवर चालविली जाणारी १५ वर्षांहून अधिक जुनी वाहने दिल्लीच्या रस्त्यांवर चालविण्यास मनाई करण्यात यावी. अशी वाहने आढळून आल्यास संबंधित प्रशासनाने ती जप्त करण्याबाबत योग्य ती कायदेशीर पाउले उचलावीत, असे त्यांनी म्हटले आहे.
उच्च आणि सर्वोच्च अशा घटनात्मक न्यायालयांनी यापूर्वी दिलेल्या आदेशांची केवळ पुनरावृत्ती एनजीटीने केली असल्याचे या खंडपीठाने म्हटले आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.