नवी दिल्ली : विद्यापीठात विद्यार्थ्यांचा आवाज दाबला जाणार नाही, तसंच विद्यापीठात विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव केला जाणार नाही, यासाठी कायदा आवश्यक असल्याचं मत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी व्यक्त केलंय. दरम्यान, राष्ट्रीय सेवक संघाने रोहित वेमुला याला ठार मारण्याची धकमी दिली होती, असा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी गेलाय.
रोहित वेमुला प्रकरणी आज दिल्लीमध्ये आंबेडकर भवन ते जंतरमंतर मोर्चा काढण्यात आलाय. या मोर्चात काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सहभागी झाले.
या मोर्चामध्ये उमर खालिदसह पाच आरोपी विद्यार्थी सहभागी होण्याची शक्यता आहे. या मोर्चात महाराष्ट्रातले दीड हजार विद्यार्थी सहभागी झाल्याची माहिती मिळतेय. महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांचं नेतृत्व रिपब्लिकन नेते प्रकाश आंबेडकर करतायत. जस्टिस फॉर रोहित वेमुला या नावाखाली काढण्यात आलेल्या या मोर्चात देशभरातल्या विद्यापीठांतले विद्यार्थी सहभागी झालेत. या मोर्चासाठी सोशल मीडियाची मोठ्या प्रमाणात मदत घेण्यात आलीय.
दरम्यान, जेएनयूबाहेर सुरक्षा व्यवस्थेत प्रचंड वाढ करण्यात आली आहे. निमलष्करी दल तैनात केलंय. जेएनयूला त्यामुळे छावणीचं स्वरुप प्राप्त केलंय. त्याचप्रमाणे जेएनयूच्या आत आणि बाहेर जायला मनाई केली गेली आहे.
जेएनयूच्या आतल्या विद्यार्थ्यांवर कारवाई होण्याची शक्यता आहे. दरम्यान, कायद्याचं राज्य आहे. आणि विद्यार्थ्यांनी सरेंडर करावं, अशी प्रतिक्रिया दिल्ली पोलीस आयुक्त बी.एस. बस्सी यांनी दिलीय.