लखनौ : लोकसभेमधील सदस्यांनी आपला एक दिवसाचा पगार नेपाळसाठी द्यावा, असे आवाहन समाजवादी पक्षाचे सर्वोच्च नेते मुलायमसिंह यादव यांनी आज केले. नेपाळमध्ये घडलेल्या भीषण भूकंपाच्या घटनेसंदर्भात मुलायम सिंह यादव बोलत होते.
या संकटसमयी समाजवादी पक्ष भारत आणि नेपाळमधील नागरिकांच्या पाठीशी असल्याचे त्यांनी सांगितले. या संकटाचा सामना करण्यासाठी समाजवादी पक्षाच्या सदस्यांनी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली. नेपाळ आणि पूर्व-उत्तर भारतामध्ये आलेल्या या आपत्तीबद्दल बोलताना यादव यांनी खेद व्यक्त केला.
उत्तर प्रदेशमध्येही या भूकंपामुळे किमान १३ नागरिकांचा मृत्यु झाला आहे. मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटूंबीयांना ५ लाख, गंभीर जखमी नागरिकांसाठी ५० हजार; तर किरकोळ जखमी झालेल्या नागरिकांसाठी २० हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्याची घोषणा उत्तर प्रदेशमधील अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखालील सरकारने केली आहे.
शनिवारच्या भूकंपानंतर नेपाळ आणि भारतातील मृतांचा आकडा सातत्याने वाढत आहे. नेपाळमधील मृतांची संख्या ३ हजार २१८ एवढी झाली असून, अनेक जण जखमी झाले आहेत. हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.