नवी दिल्ली : आपचे नेते शांतीभूषण यांनी भाजपच्या मु्ख्यमंत्रीपदाच्या उमेदवार किरण बेदी यांचं कौतुक केलं आहे. किरण बेदी यांच्यावर स्तुतिसुमने उधळतांना भूषण म्हणाले, आप नेते अरविंद केजरीवाल यांच्या इतक्याच बेदी याही कर्तबगार आणि लायक आहेत, असं प्रशस्तीपत्र शांती भूषण यांनी दिलं आहे.
बेदी या एक उत्तम प्रशासक आहेत. त्या दिल्लीला एक स्वच्छ व कार्यतत्पर सरकार देऊ शकतील, असे भूषण म्हणाले. बेदी यांचे नाव मुख्यमंत्री पदासाठी घोषित करणे, हा भाजपचा 'मास्टरस्ट्रोक' असल्याची प्रतिक्रया भूषण यांनी यावेळी व्यक्त केली. मात्र बेदी या आपकडून मुख्यमंत्री पदाच्या उमेदवार झाल्या असत्या, तर आपण अधिक आनंदित झालो असतो, अशी पुस्तीही त्यांनी यावेळी जोडली.
भूषण यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना, आप नेते आशुतोष यांनी भूषण यांचे हे वैयक्तिक मत असून पक्ष त्याच्याशी सहमत नसल्याचे सांगितले. आपमध्ये पक्षांतर्गत लोकशाही असून नेत्यांना त्यांचे स्वतंत्र मत व्यक्त करण्याचा हक्क असल्याचे आशुतोष यांनी स्पष्ट केले. दरम्यान, बेदी यांनी भूषण यांच्या पाठिंब्याबद्दल त्यांचे आभार मानले आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.