उत्तर प्रदेशमध्ये शीला दीक्षित काँग्रेसच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार

उत्तर प्रदेशमध्ये पुढच्या वर्षी विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. याआधी काँग्रेसनं मोठा निर्णय घेतला आहे. 

Updated: Jul 14, 2016, 05:02 PM IST
उत्तर प्रदेशमध्ये शीला दीक्षित काँग्रेसच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार  title=

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमध्ये पुढच्या वर्षी विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. याआधी काँग्रेसनं मोठा निर्णय घेतला आहे. उत्तर प्रदेशमध्ये शीला दीक्षित या काँग्रेसच्या मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार असणार आहेत. काँग्रेसनं याची अधिकृत घोषणा केली आहे. 

उत्तर प्रदेशमध्ये ब्राम्हण मतदारांचा टक्का मोठा आहे. म्हणूनच या निवडणुकांसाठी काँग्रेसनं ज्यांची रणनिती प्रमुख म्हणून निवड केली आहे त्या प्रशांत किशोर यांनीही शीला दीक्षित यांच्याकडे धुरा द्यावी अशी मागणी केली होती. 

शीला दीक्षित उत्तर प्रदेशचे काँग्रेस नेते उमाशंकर दीक्षित यांची मुलगी आहेत. उमाशंकर दीक्षित हे केंद्रीय मंत्री आणि राज्यपालही होते. मागच्याच महिन्यामध्ये शीला दीक्षित यांनी सोनिया आणि राहुल गांधी यांची भेट घेतली होती. या भेटीपासूनच शीला दीक्षित यांच्याकडे मोठी जबाबदारी देण्यात येईल, असे संकेत मिळत होते. 

उत्तर प्रदेशमध्ये बहुतेक काळ ब्राम्हणांची मत काँग्रेसला मिळत होती, पण राम मंदिर मुद्दा आणि मंडल आयोगामुळे ही मतं भाजपकडे गेली असं तेव्हाच्या काँग्रेस नेत्यांनी बोलून दाखवलं होतं. मागच्या काळात मायावतींनीही सोशल इंजिनिअरिंग करत ब्राम्हण उमेदवरांना निवडणुकीचं तिकीट दिलं होतं. याचा फायदा मायवतींच्या बसपाला झाला होता. 

आता पुन्हा एकदा काँग्रेसनं ब्राम्हण मतदारांना आकर्षित करायचा प्रयत्न केला आहे. दिल्लीतल्या राजकारणाचा रस्ता उत्तर प्रदेशातून जातो असं म्हणतात. यामुळे काँग्रेसची उत्तर प्रदेशसाठी असलेली ही रणनिती अडचणीत असलेल्या काँग्रेसला दिल्लीचा रस्ता दाखवणार का हाच मुख्य प्रश्न आहे.