नवी दिल्ली : केंद्रीय राज्यमंत्री गिरीराज सिंग यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावर केलेल्या वादग्रस्त टिकेनंतर काँग्रेसने तीव्र नापसंती व्यक्त करताना त्यांना तात्काळ अटक करावी, अशी मागणी केली आहे.
सोनिया गांधी यांच्यावर केलेल्या वादग्रस्त विधानावर काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी तीव्र शब्दांत टीका करत, पंतप्रधान मोदींनी अशी बेताल वक्तव्य करणा-या गिरीराज सिंग या नेत्यांना पदावरून हटवावं, अशी मागणी केली आहे.
त्याचवेळी गिरीराज सिंग यांना तत्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसनं केलीय. त्यांच्याविरूद्ध काँग्रेस पक्ष कायदेशीर कारवाई करणार असल्याचंही काँग्रेस प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांनी स्पष्ट केलंय.
केंद्रीय राज्यमंत्री गिरीराज सिंग यांची जीभ आज भलतीच घसरली. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर टीका करता करता, त्यांनी सोनिया गांधींना उद्देशून अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्य केलं.
राजीव गांधींनी एखाद्या नायजेरियन तरूणीशी लग्न केलं असतं, तर काँग्रेसनं तिला अध्यक्ष म्हणून स्वीकारलं असतं का? असा वादग्रस्त सवाल गिरीराज सिंग यांनी केलाय. त्यांच्या या वर्णद्वेषी वक्तव्यामुळं नव्या वादाला तोंड फुटलंय. पातळी सोडून केलेली ही टीका मंत्र्याला शोभत नाही, त्यांना तत्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसनं केली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.