नवी दिल्ली : आम आदमी पार्टीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक थोड्याच वेळात सुरु झाली आहे. या बैठकीत प्रशांत भूषण आणि योगेंद्र यादव यांना पार्टीतून बाहेर काढलं जाण्यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार आजच्या बैठकीत दोन वेगवेगळे प्रस्ताव मांडले जाणार आहेत. ज्यांत पहिला प्रस्ताव हा प्रशांत भूषण आणि योगेंद्र यादव यांना राष्ट्रीय कार्यकारिणीतून बाहेर काढण्याचा असेल, तर दुसरा प्रस्ताव त्यांची पार्टीतून हकालपट्टी करण्याचा असेल.
दरम्यान, आपचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची एक खळबळजनक ऑडिओ टेप झी मीडियाच्या हाती लागलीय. २२ मार्च २०१५ ची ही टेप असून, त्यामध्ये केजरीवाल आणि त्यांचे सहकारी उमेश सिंह यांच्यातील फोनवरील संभाषण रेकॉर्ड करण्यात आलंय.
या टेपमध्ये केजरीवालांनी योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांना उद्देशून शिवीगाळ केलीय. एवढंच नव्हे तर आप पक्ष सोडून जाण्याची आणि दिल्लीतल्या ६७ आमदारांना सोबत घेऊन नवा राजकीय पक्ष स्थापन करण्याची धमकीही दिली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.