जगातील सर्वात शक्तिशाली २० व्यक्तींमध्ये सोनिया गांधी आणि पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचा समावेश आहे.
फोर्ब्सने प्रसिद्ध केलेल्या यादीत सोनिया गांधी आणि पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग अनुक्रमे ११ आणि १९ व्या स्थानावर आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा या यादीत पहिल्या स्थानावर आहेत.फोर्ब्स मासिकाकडून दरवर्षी जगातील शक्तिशाली व्यक्तींची यादी प्रसिद्ध करण्यात येते.
चीनचे राष्ट्राध्यक्ष हू जिंताओ यांना मागे टाकत ओसामा बिन लादेनचा खात्मा करणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी पहिले स्थान मिळवले आहे. रशियाचे पंतप्रधान ब्लादिमार पुतीन दुस-या स्थानावर आले असून हू जिंताओ मात्र पहिल्या स्थानावरुन तिस-या स्थानावर गेले आहेत. बिल गेट्स पाचव्या स्थानावर तर फेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्ग नवव्या स्थानावर आहे.
रिलायन्स कंपनीचे प्रमुख मुकेश अंबानी ३५ व्या स्थानावर आहेत. पाकिस्तानचे लष्करप्रमुख अश्फाक परवेझ कयानी ३४ व्या स्थानावर, दलाई लामा ५१ व्या स्थानावर आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम ५७ व्या स्थानावर आहे. तर भारतीय उद्योगपती लक्ष्मी मित्तल ४७ आणि विप्रोचे अध्यक्ष अझिम प्रेमजी ६१ व्या स्थानावर आहेत.