दक्षिण फिलिपिन्समधील बेटांना वादळाचा जोरदार तडाखा बसल्याने एक हजारपेक्षा अधिक नागरिक मृत्यूमुखी पडल्याची भिती सरकारी अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
'वाशी' वादळाचा शुक्रवारी रात्री मिंदानाओ बेटाला तडाखा दिला. त्यानंतर आलेल्या पुरामुळे अनेक जणांचे बळी गेलेत. कॅगायन दी ऑर आणि लिगन या भागांना या वादळाचा सर्वाधिक फटका बसला आहे. या दोन्ही भागातीलच ५८० नागरिकांचा यामध्ये मृत्यू झाला आहे. वादळाने तडाखा दिल्यानंतर अनेक झाडे उन्मळून पडलीत.
जोरदार वादळामुळे जीवित हानीबरोबर वित्तहानी झाली. आतापर्यंत एक हजारापेक्षा जास्त लोक वादळाचे बळी गेल्याचे सांगण्यात येत आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख बेनिटो रामोस यांनी मृतांच्या संख्येत वाढ होत असल्याचे सांगितले. अनेक नागरिक वाहून गेले असण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.