www.24taas.com, झी मीडिया, लंडन
७४ वर्षांपूर्वी... त्यानं तिला पाहिलं... तिनं त्याला पाहिलं... तेव्हा खरं तर ते दोघेही उमलत्या वयात होते... दोघांच्याही नजरांची भेट झाली आणि ते एकमेकांच्या प्रेमातच पडले. पण, दुसऱ्या महायुद्धानं त्यांच्यापासून हे प्रेम हिरावून घेतलं. ती एकिकडे तर तो दुसरीकडे फेकला गेला... आणि तब्बल ७४ वर्षांनंतर त्यांची पुन्हा एकदा भेट झाली. आणि या वयातही त्यांनी आपल्या पहिल्या प्रेमाचं रुपांतर विवाहात करण्याचा निर्णय घेतला.
ही गोष्ट नाही तर खरीखुरी गोष्ट आहे... दुसऱ्या महायुद्धादरम्यान १३ वर्षांच्या ‘बर्नी’ आपला प्रियकर ‘बाब’पासून दूर झाली. यावेळी तिनं कधी विचारही केला नसेल की हाच बाब पुन्हा एकदा तिच्या जिवनाचा एक भाग बनू शकेल. परंतू, योगायोग म्हणा किंवा प्रेम ही दोघं पुन्हा एकमेकांना भेटली नव्हे ही भेट घडवून आणली गेली आणि तीही बर्नीच्या मुलीनं… आणि प्रेमात अडकलेल्या दोघांनी पुन्हा एकदा एकत्र येण्याचा निर्णय घेतला आणि हे दोघे विवाहबंधनात अडकले.
बर्नी आज ८७ वर्षांची आहे आणि बाब ८९ वर्षांचा... या दोघांची भेट लहानपणी झाली आणि दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात या दोघांची ताटातूट झाली. त्यानंतर दोघांच्या जीवनात अनेक चढ-उतार आले. बर्नी लग्न करून न्यूझीलंडला निघून गेली. बाबनंही लग्न केलं. परंतु, बर्नीच्या पतीच्या निधनानंतर त्यांच्या मुलीनं ‘बाब’ला शोधून काढण्याचा विडा उचलला.... तिचा प्रयत्न यशस्वी झाला.
२०११ साली बाबचा ठावठिकाणा लागला. यानंतर बर्नी पुन्हा एकदा ब्रिटनमध्ये गेली. बाबशी तिचा संपर्क झाला. दोघांच्या भेटीगाठी वाढल्या आणि या वयातही दोघे पुन्हा एकदा एकमेकांच्या नव्यानं प्रेमात पडले... आणि दोन वर्षानंतर दोघांनी आपल्या मुलांच्या आणि नातेवाईकांच्या साक्षीनं पुन्हा एकदा एकमेकांचा हात धरला.
बाब म्हणतो, मला माझं प्रेम खूप उशीरा का होईना पण मिळालं.. तर बर्नी म्हणते, माझ्या प्रेमासाठी मी या वयात १३ मीलचं अंतर कापलंय. बाब आणि बर्नीला दहा नातवंड आणि पाच परतवंडं आहेत.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.