नवी दिल्ली : आता, ब्रिटनमध्ये पिता बनल्यानंतर सुट्टी मिळणार आहे. गेल्या रविवारी लागू झालेल्या एका कायद्यानुसार आता अपत्याच्या माता आणि पित्याला मिळून ५० आठवड्यांची सुट्टी मिळणार आहे.
महत्त्वाचं म्हणजे, हा कायदा अपत्याला केवळ जन्म देणाऱ्याच माता-पित्यासाठी नाही तर मुलांना दत्तक घेणाऱ्या माता-पित्यांसाठीही लागू होणार आहे. सरकारी अनुमानानुसार, यामुळे प्रत्येक वर्षी दोन लाख ८६ हजार जोडप्यांना याचा फायदा होईल.
मुलांच्या पालन-पोषणात महिला आपल्या करिअरमध्ये मागे पडू नयेत, यासाठी वया अगोदर अस्तित्वात असणाऱ्या कायद्यात संशोधन आणि बदल करण्यात आलेत. सध्या बहुतेक ठिकाणी महिलांना आपली मुलं किंवा करिअर यापैंकी एकाचीच निवड करावी लागते. नव्या व्यवस्थेत माता-पिता आपल्या सुट्ट्या एकमेकांमध्ये वाटून घेऊ शकतात.
ब्रिटनमध्ये कोणत्याही गरोदर महिलेला नोकरीवरून कमी करणं बेकायदेशीर आहे. उपप्रधानमंत्री निक क्लेग यांच्या म्हणण्यानुसार, आपल्याला जुन्या मान्यतांपासून पुढे जावं लागेल. मुलांसाठी घरी राहाणं ही केवळ आईची जबाबदारी नाही. अनेक पित्यांनाही हा पर्याय हवाय. त्यांनाही आपल्या अपत्याबरोबर वेळ व्यतित करायची इच्छा असते. आम्हाला एक न्यायपूर्ण समाज बनवायचाय.
याशिवाय, मुलं १८ वर्षांची होईपर्यंत प्रत्येक माता-पित्याला मिळून प्रत्येक अपत्यासाठी १८ आठवड्यांची बिनापगार सुट्टी घेण्याचाही अधिकार दिला गेलाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.