www.24taas.com , वृत्तसंस्था, नवी दिल्ली
`शत्रूचा शत्रू तो आपला मित्र` या सूत्राचा अवलंब करत चीनने पाकिस्तानला दोन अणूभट्टय़ा देण्याची तयारी दर्शविली आहे. मात्र, त्यामुळे भारतापुढे पेच निर्माण झाला आहे. भारताने याबाबत राजनैतिक व अधिकारी पातळीवर चीनकडे नाराजी व्यक्त केली असून अणुपुरवठादार गटाच्या कानावरही ही बाब घातली आहे.
चीन पाकिस्तानला आधुनिक व प्रगत अणुभट्टी विकणार ११०० मेगावॉटची अणुभट्टी `एसीपी १०००` या मालिकेत ती आहे. ही अणुभट्टी कराचीत कनुप २ व ३ या भागात बसवण्यात येत असून त्याची किंमत ९.६ अब्ज डॉलर इतकी आहे. या अणुभट्टीच्या संदर्भात दोन्ही देशात मागीलवर्षी झालेल्या चर्चेदरम्यानच भारताने आपला आक्षेप नोंदवला होता. मात्र चायना नॅशनल कॉर्पोरेशन लि. या कंपनीने पाकिस्तानी अधिकाऱ्यांशी आण्विक भट्टी उभारण्याच्या दृष्टीने काही प्राथमिक करार केले आहेत.
अणुपुरवठादार देश व नॉन प्रोलीफिरेशन ऑफ न्युक्लिअर वेपन(एनपीटी)चा सदस्य या नात्याने चीनने अशा प्रकारे अणुभट्टीची विक्री करणे योग्य नाही, अशी भूमिका भारताने घेतली आहे. चीनने पाकिस्तानशी अणुसहकार्य अशा प्रकारे वाढवत नेले तर त्यामुळे भारताला धोका आहे. पाकिस्तानचा अणुकार्यक्रम नागरी नसून लष्करी स्वरूपाचा आहे. त्यामुळे भारताला धोका आहे. कारण अणुसुरक्षा गटात काही मध्यस्थांमार्फत भारताने गेल्यावर्षी हा मुद्दा मांडला होता, त्यानंतर १३ व १४ जूनला प्राग येथे झालेल्या अणु सुरक्षा गटाच्या बैठकीतही चीनने पाकिस्तानला अणुभट्टी देण्याबाबत काही देशांनी आक्षेप घेतला होता.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.