www.24taas.com, झी मीडिया, बगदाद
‘आयएसआयएस’चा प्रमुख अबू बक्र अल बगदादी जगातला मोस्ट वॉण्टेड दहशतवादी बनलाय. कोण आहे हा बगदादी? कसा बनला तो जगात सर्वात मोठा क्रुरकर्मा?
43 वर्षांच्या अबू अक्र अल बगदादीनं बगदादच्या विद्यापीठातून डॉक्टरेट मिळवलीय. इसिसचा प्रमुख असलेला बगदादी आपल्या हालचालीबाबत अत्यंत संवेदनशील आहे. तो लादेन किंवा अल जवाहिरीप्रमाणे कधीही व्हिडिओ संदेश देत नाही. जवळच्या सहकाऱ्यांनाही तो क्वचितच प्रत्यक्ष भेटतो. आपल्या कमांडरना भेटण्यापूर्वी चेहऱ्यावर मास्क लावतो, असंही सांगितलं जातं. त्यामुळे ‘इनव्हिजबल शेख’ हे नावंही त्याला त्याच्या सहकाऱ्यांनी दिलंय.
2003 मध्ये अमेरिकेनं इराकवर हल्ला केला होता तेव्हा बगदादी एका मशिदीमध्ये मौलवी होता. सद्दाम हुसेन यांच्या राजवटीतच तो कट्टर जिहादी बनला, अशी माहिती समोर आलीय. दक्षिण इराकमध्ये अमेरिकेच्या कैदेत चार वर्ष घालवल्यानंतर तो अधिक कडवा दहशतवादी बनला.
चार वर्षांपूर्वी बगदादी सर्वप्रथम चर्चेत आला. त्यावेळी त्याच्या इसिस या संघटनेनं सीरियाच्या अल-नसराशी हातमिळवणी करण्याचा प्रयत्न केला होता. सीरियाचा ताबा अल-नसराकडे द्यावा हा जवाहिरीचा सल्ला त्यानं जाहीररित्या फेटाळला होता. जवाहिरीचा सल्ला धुडकावल्यानंतर त्याच्या दहशतीत कमालीची वाढ झाली. क्रुरतेच्याबाबतीत इसिसनं अल कायदाला मागे टाकलंय, असं स्वतः जवाहिरीनंही मान्य केलंय.
पाकिस्तान आणि उत्तर आफ्रिकामध्ये आजही अल कायदा प्रबळ आहे. मात्र, बगदादी हा सर्वात संगठीत दहशतवादी नेता म्हणून आपली ओळख तयार करण्यात झपाट्यानं यशस्वी होतोय. जिहादींमध्ये धार्मिक गुरु अशी ओळख निर्माण करणाऱ्या जवाहिरीपेक्षा बगदादीची लोकप्रियाताही वाढलीय. त्यामुळेच ऑक्टोबर 2011 मध्ये बगदादीला जिवंत किंवा मृत पकडून देणाऱ्या व्यक्तीला 60 कोटी रुपयांचे बक्षीस अमेरिकेनं ऑक्टोबर 2011 मध्येच जाहीर केलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.