www.24taas.com, झी मीडिया, बगदाद
इराकमध्ये सध्या सुरु असलेल्या अशांत परिस्थितीला ‘आयएसआयएस’ ही दहशतवादी संघटना जबाबदार आहे. ISIS नं क्रुरतेमध्ये अन्य दहशतवादी संघटनांना मागं टाकलंय. ही जगातली सर्वात श्रीमंत दहशतवागदी संघटना समजली जाते. तसंच या संघटनेच्या दहशतवाद्यांना गलेलठ्ठ पगारही मिळतो.
12 हजार दहशतवाद्यांसमोर इराकी सैन्य हतबल का झालंय? हा प्रश्न साऱ्या जगाला सध्या सतावतोय. जगातल्या सर्वात क्रुरकर्मा दहशतवादी म्हणून अबू बक्र अल बगदादीचा उदय कसा झाला? ‘इस्लामिक स्टेट ऑफ ग्रेटर इराक अॅन्ड सिरीया’ किंवा इसिस या दहशतवादी संघटनेला मदत कोण करतंय? आणि इसिस ही जगातली सर्वात श्रीमंत दहशतवादी संघटना कशी बनली? असे अनेक प्रश्न सध्या अनेकांना पडलाय.
इराकचे पंतप्रधान नूरी अल मलीकी यांनी या साऱ्या प्रश्नांचं उत्तर नुकतचं दिलंय. सौदी अरब आणि कुवेत हे दोन देश इसिसला फंडीग करत असल्याचा आरोप त्यांनी केलाय. ‘जिहादला मजबूत करा’ अशी घोषणा कुवेतच्या प्रत्येक लहान मोठ्या शहरात दिली जातेय. ‘भरघोस आर्थिक मदत देऊन जिहादला मजबूत करा’ असं आवाहनंही केलं जातंय.
इसिसनं मोसूल या इराकमध्ये दुसऱ्या क्रमांकाच्या मोठ्या शहराचा ताबा घेतल्यानंतर तिथल्या सेंट्रल बॅँकमधून 429 मिलियन डॉलर म्हणजेच जवळपास 2 हजार 574 कोटी रुपयांची लूट केलीय. इसिसला जॉर्डन, सीरिया आणि सौदी अरेबियामधल्या आपल्या समर्थकाकडून मोठी फंडीग होत असल्याचं अमेरिकेतल्या ‘कौन्सिल ऑन फॉरेन रिलेशन’ या संस्थेच्या अहवालात स्पष्ट करण्यात आलंय. तसंच इराक आणि सीरियामध्ये आपल्या प्रभाव क्षेत्रातल्या व्यापाऱ्याकडूनही संघटना दर महिना 4 हजार 800 कोटींची खंडणी वसूल करत असल्याचंही या अहवालात स्पष्ट करण्यात आलंय. तसंच इसिसचा उत्तर सीरियामधल्या तेल विहिरींवरही ताबा असून त्याच्या विक्रीतून या संघटनेच्या तिजोरीत भर पडतेय.
या सर्व भक्कम आर्थिक स्त्रोतामुळेच इसिस ही जगातली सर्वात श्रीमंत दहशतवादी संघटना बनलीय. या संघटनेच्या अतिरेक्यांना दरमहा 1 लाख 80 हजार रुपये पगार दिला जातो. आपलं उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी इसिसनं 220 अब्ज रुपयांचं बजेट निश्चित केलंय. या यादीत दुसरा क्रमांक हिजबूल मुजाहिद्दीनचा असून त्यांचा वार्षिक खर्च जवळपास 30 हजार कोटी आहे.
तर अफगाणिस्तानमधल्या तालिबानी राजवटीचं वार्षिक बजेट 2 हजार 400 कोटी होतं. सोमालियामध्ये अल कायदाशी संलग्न असलेली अल शबाब या संघटनेचं वार्षिक बजेट 600 कोटी असून अमेरिकेवर 9/11 चा हल्ला करण्यापूर्वी अल कायदाचं वार्षिक बजट 30 मिलियन डॉलर होतं. आपलं उद्दीष्ट पूर्ण झाल्यानंतर इसिस संघटनेचे दहशतवादी जिहादी केक कापून आनंद साजरा करतात. मोसूल शहरावर ताबा मिळवल्यानंतर त्यांनी अशाच प्रकारचं सेलिब्रेशन केलं होतं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.