इस्लामाबाद : अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी आज पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्याशी फोनवरून बातचीत केली. भारताच्या प्रजासत्ताक दिनासाठी ओबामा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्यासंबंधी त्यांनी शरीफ यांना माहिती दिली.
भारताने दिलेलं आमंत्रण ओबामा यांनी स्विकारल्यामुळे शरीफ यांच्या पायाखालची वाळूच सरकलीय की काय? असंच संभाषण या चर्चेत झालं. कारण, पाकिस्तानलाही ओबामांनी भेट द्यावी असा आग्रह धरतानाच भारत सातत्याने पाकिस्तानला कसा त्रास देत आहे अशा सूराचं रडगाणंही शरीफ यांनी गायलंय.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी स्वत: पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना फोन करून आपल्या भारत दौऱ्याविषयी माहिती दिली. या चर्चेदरम्यान शरीफ यांनी ओबामा यांना गेल्या वर्षी वॉशिंग्टनमध्ये पाकिस्तानला येण्याचं दिलेल्या आमंत्रणाची आठवण करून दिली.
येत्या वर्षी जानेवारीला आपल्या नियोजित भारत दौऱ्यादरम्यान भारतीय नेतृत्वासमोर त्यांनी काश्मीर मुद्द्याला जरूर हात घालावा. कारण हा मुद्दा आशियामध्ये स्थिरता आणि आर्थिक सहयोगासाठी महत्त्वपूर्ण आहे, असं शरीफ यांनी यावेळी ओबामा यांना म्हटलंय, असं पाकिस्तानच्या पंतप्रधान कार्यालयानं म्हटलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.