www.24taas.com, वॉशिंग्टन
ओसामा बिन लादेनच्या मृत्यूसंदर्भात नवी माहिती आता पुढे आली आहे. पाकिस्तानच्या अबोटाबादमध्ये जेव्हा अमेरिकेच्या सुरक्षा दलाने कारवाई करत ओसामाला खतम केलं, त्याक्षणी ओसामा निःशस्त्र होता. त्याला त्याच्या खोलीत असताना गोळी मारली नव्हती, तर तो जेव्हा दिवाणखान्यातून बाहेर पाहात होता, तेव्हा गोळी चालवण्यात आली होती.
अमेरिकन नौसेनेच्या मार्क बिसोनेट या माजी अधिकाऱ्यांनी ‘नो इझी डे: द फस्टहँड अकाउंट ऑफ द मिशन दॅट किल्ड ओसामा बिन लादेन’ या पुस्तकात ओसामाच्या हत्येसंदर्भातील काही घटनांवर प्रकाश टाकला आहे. हे अधिकारी ओसामा नायनाटाच्या मिसनमध्ये सहभागी होते. या पुस्तकात लिहिलं आहे, की ओसामा वरील मजल्यावरीलआपल्या खोलीतून बाहेर पाहात होता. त्याच क्षणी एका सैनिकाने त्याला गोळी घातली.
ओसामाच्या हत्येसंदर्भातली बरीच माहिती या पुस्तकात दिली आहे. मुख्य म्हणजे अमेरिकेने यापूर्वी जाहीर केलेल्या माहितीपेक्षा पुस्तकात दिलेली माहिती खूपच वेगळी आहे. या पुस्तकातील माहिती आत्तापर्यंत जगासमोर आलेली नव्हती. ही माहिती सत्य असल्याचं लेखकासहित अनेकांचं म्हणणं आहे. पण नक्की सत्य कुठलं, हा प्रश्न आता उभा राहिला आहे.