इस्लामाबाद: दहशतवादी संघटना लश्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिज सईदनं भारताविरुद्ध पुन्हा एकदा गरळ ओकलीय. एका पाकिस्तानी टीव्ही चॅनलला दिलेल्या इंटरव्ह्यूमध्ये हाफिज सईदनं पाकिस्तान सरकार आणि सैन्य काश्मीरात फुटीरवाद्यांची मदत करत असल्याचा खुलासा त्यानं केला. काश्मीरला स्वतंत्र करण्यासाठी पाकिस्तानच्या मदतीनं जिहाद केला जातोय.
काश्मीर बळकावण्यासाठी पाकिस्ताननं छेडलेल्या छुप्या युद्धात फुटीरतावादी काश्मिरींना पाठिंबा देण्याचा इरादा स्पष्ट केला. 'फुटीरवादी नेता मसरत आलमनं पाकिस्तानी ध्वज फडकवून काहीही गैर केलं नाही. श्रीनगर हा वादग्रस्त भाग आहे. तिथं पाकिस्तानच्या बाजूनं नारेबाजी करणं गुन्हा कसा होऊ शकतो?' असं प्रक्षोभक विधानं सईदनं केलंय.
दरम्यान, काश्मीर खोऱ्यात हुरियतच्या जहाल गटाकडून सुरू असलेल्या आंदोलनानं शनिवारीही हिंसक वळण घेतलं. बडगाम जिल्ह्यात निदर्शनादरम्यान केंद्रीय राखीव पोलीस दलानं (सीआरपीएफ) केलेल्या गोळीबारात एक युवक ठार तर दोघं जखमी झाले. या घटनेच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश जम्मू-काश्मीर सरकारनं दिले आहेत.
हुरियत कॉन्फरन्सच्या मवाळ गटाचे अध्यक्ष मीरवाईज उमर फारुख यांच्यासह अनेक फुटीरवादी नेत्यांना नजरकैदेत ठेवण्यात आलंय. हा लढा अधिक तीव्र करून भारताला काश्मीरचा त्याग करण्यास भाग पाडू. काश्मिरी जनतेचा आवाज दडपण्याचा भारत सरकारनं प्रयत्न केल्यास आम्हीही ताकदीनिशी बदला घेऊ, असं हाफिज सईद बरळलाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.