काठमांडू : भारत - नेपाळ सीमेवर तणाव निर्माण झालाय. नेपाळमधील भारतीय सीमारेषेपासून जवळ असलेल्या बिरगुंज शहरामधील आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एका भारतीय नागरिकाचा मृत्यू झाला. या घटनेबाबत भारताने तीव्र चिंता व्यक्त केलेय.
आशिष कुमार राम (२४) असे मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे. तो मूळचा बिहारमधील रकसौल येथील आहे. भारतामधून नेपाळमध्ये प्रवेश करण्याचा मुख्य मार्ग असलेल्या शंकराचार्य गेटजवळच ही घटना घडली. भारतीय सीमारेषेजवळ आंदोलन सुरु होते. पोलिसांवर मोठ्या प्रमाणात दगडफेक करण्यात आल्यानंतर तणाव होता. पोलिसांनी गोळीबार केल्यानंतर भारतीय तरुणाचा मृत्यू झाला.
नेपाळमध्ये नव्या राज्यघटनेच्या स्वीकारल्यानंतर काही राजकीय पक्षांनी आंदोलन सुरु केले आहे. या राज्यघटनेच्या विरोधातील या आंदोलनामुळे नेपाळ-भारत सीमारेषेवर तणाव आहे. दक्षिण नेपाळमधील आंदोलनामध्ये आत्तापर्यंत जवळपास ५० नागरिक मृत्युमुखी पडलेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.