नवी दिल्ली : काश्मीरचा भाग समाविष्ट नसलेल्या भारताच्या नकाशाचे चित्र, फेसबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्ग यांनी आपल्या टाईमलाईनवरील एका पोस्टमध्ये वापरले आहे. यावर नेटिझन्सकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. काश्मीरला भारताच्या नकाशात दाखविण्याची सूचना झुकेरबर्ग यांना करण्यात आली आहे.
मार्क यांनी त्यांच्या टाईमलाईनवर अलिकडेच इंटरनेट डॉट ओआरजीबाबत माहिती देणारी पोस्ट केली आहे. आफ्रिकेतील मलावी येथे इंटरनेट डॉट ओआरजीच्या माध्यमातून विनामूल्य सेवा सुरु करण्यात आल्याबाबत मार्क यांनी फेसबुक पोस्टद्वारे माहिती दिली आहे. त्याच पोस्टमध्ये आजपर्यंत ज्या देशांना अशी सुविधा देण्यात आली आहे त्यांची नावे आणि नकाशेही देण्यात आले आहेत. मात्र भारताचा नकाशा देताना त्यातून काश्मीरचा भाग वगळण्यात आला आहे.
या पोस्टवर नेटिझन्सनी प्रतिक्रियांच्या माध्यमातून नाराजी व्यक्त केली असून नकाशा सुधारण्यची सूचना मार्कला केली आहे. अशू धार यांनी या पोस्टवर केलेल्या प्रतिक्रियेमध्ये "प्रिय मार्क, आपण अनेकवेळा भारतामध्ये आला आहात. शेअर करण्यापूर्वी आपण भारताच्या नकाशाची खात्री करायला हवी होती.
भारताच्या ज्या भागात मी राहतो तो भागच तुम्ही नकाशात दाखविलेला नाहीत. खरच नाराज झालो आहे" अशा शब्दात आपली नाराजी व्यक्त केली आहे. सर्वप्रथम अखिल देव यांनी "कृपया भारताचा नकाशा दुरुस्त करावा, त्यातून काश्मीरला वगळण्यात आले आहे "असे म्हणत ही बाब निदर्शनास आणून दिली आहे.
भारताच्या नकाशाबाबत प्रतिक्रियांद्वारे नाराजी व्यक्त करत भारतीय मार्कला नकाशा बदलण्याची सूचना करत आहेत. मात्र अद्याप मार्कने त्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.