बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मुंबईत मेळावा आयोजित करण्यात आला आहे. अंधेरीतील छत्रपती शिवाजी महाराज स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये हा मेळावा पार पडत आहे. या कार्यक्रमासाठी भव्य आयोजन करण्यात आलं आहे. दरम्यान उद्धव ठाकरेंच्या या मेळाव्यात स्पीकरवर थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं गुणगान करणारा पोवाडा लागल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या. राज ठाकरेंच्या पोवाड्यामुळे शिवसैनिक चक्रावले होते. चूक लक्षात येताच आयोजकांनी पोवाडा बंद केला.
उद्धव ठाकरेंच्या सभेआधी स्पिकरवर लावण्यात आलेल्या पोवाड्यात उद्धव आणि राज ठाकरे या दोघांनी शिवसेना कशी वाढवली असा पोवाडा लावला गेला होता. या पोवाड्यामुळे शिवसैनिकांच्या भुवया उंचावल्या होत्या. मात्र चूक लक्षात येताच आयोजकांनी पोवाडा बंद केला.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने नेते सुनील प्रभू यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पतंप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लहिले आहे. बाळासाहेब ठाकरेंना मरणोत्तर भारतरत्न द्यावा, अशी मागणी या पत्रातून करण्यात आली आहे.
बाळासाहेब ठाकरेंनी आपलं संपूर्ण आयुष्य सामान्य जनतेच्या हितासाठी समर्पित केले. ते केवळ राजकीय पक्षाचे नेते नव्हते तर असंख्य लोकांच्या हृदयातील प्रेरणास्थान होते. मराठी जनतेचे हक्क, स्वाभीमान आणि अस्मितेसाठी त्यांनी दिलेले योगदान अतुलनीय आहे.
त्यांच्या कर्तुत्वामुळे महाराष्ट्राच्या आणि देशाच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय जीवनावर स्थायी प्रभाव आहे. बाळासाहेबांच्या विचारांनी आणि नेतृत्वाने महाराष्ट्राला दिशा दिली. त्यांच्या ठाम राष्ट्रभक्तीचा संदेश आणि सामान्य जनतेप्रती असलेली कळवळ आजही लाखो लोकांना प्रेरणा देते. भारतरत्न हा सन्मान त्यांच्यासाठी योग्य श्रद्धांजली ठरेल. तसेच त्यांच्या कार्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव होईल, असे सुनील प्रभूंनी आपल्या पत्रातून म्हटलंय. बाळासाहेबांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्याने त्यांच्या अत्युच्च्य कार्याची योग्य दखल घेतली जाईल, असेही ते आपल्या पत्रात म्हणाले आहेत.