Bharat Ratna to Balasaheb Thackeray: बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त दोन्ही शिवसेनेचे मुंबईत मेळावे होणार आहेत.शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून अंधेरीतील छत्रपती शिवाजी महाराज स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये मेळावा आयोजित करण्यात आलाय.यावेळी उद्धव ठाकरे शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार आहेत. तर बीकेसीत एकनाथ शिवसेनेकडून शिवउत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय. या कार्यक्रमात लाडक्या बहिणींच्या हस्ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सत्कार केला जाणार आहे.मुंबई महापालिकेच्या तोंडावर होणा-या या मेळाव्यांना महत्त्व प्राप्त झालंय. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय. या पार्श्वभूमीवर बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न देण्याची मागणी शिवसेनेकडून करण्यात आली आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने नेते सुनील प्रभू यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पतंप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लहिले आहे. बाळासाहेब ठाकरेंना मरणोत्तर भारतरत्न द्यावा, अशी मागणी या पत्रातून करण्यात आली आहे.
बाळासाहेब ठाकरेंनी आपले संपूर्ण आयुष्य सामान्य जनतेच्या हितासाठी समर्पित केले. ते केवळ राजकीय पक्षाचे नेते नव्हते तर असंख्य लोकांच्या हृदयातील प्रेरणास्थान होते. मराठी जनतेचे हक्क, स्वाभीमान आणि अस्मितेसाठी त्यांनी दिलेले योगदान अतुलनीय आहे.
त्यांच्या कर्तुत्वामुळे महाराष्ट्राच्या आणि देशाच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय जीवनावर स्थायी प्रभाव आहे. बाळासाहेबांच्या विचारांनी आणि नेतृत्वाने महाराष्ट्राला दिशा दिली. त्यांच्या ठाम राष्ट्रभक्तीचा संदेश आणि सामान्य जनतेप्रती असलेली कळवळ आजही लाखो लोकांना प्रेरणा देते. भारतरत्न हा सन्मान त्यांच्यासाठी योग्य श्रद्धांजली ठरेल. तसेच त्यांच्या कार्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव होईल, असे सुनील प्रभूंनी आपल्या पत्रातून म्हटलंय. बाळासाहेबांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्याने त्यांच्या अत्युच्च्य कार्याची योग्य दखल घेतली जाईल, असेही ते आपल्या पत्रात म्हणाले आहेत.
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न द्या अशी मागणी, बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीदिनी शिवसेना च्या नेत्यांची केली आहे.बाळासाहेबांनी सदैव महाराष्ट्र आणि देशहितासाठी काम केलं, असं मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या. तर बाळासाहेब ठाकरेंना भारतरत्न देण्यात कोणाचाही विरोध असण्याचं कारण नाही असं सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाटांनी सांगितलं. मात्र अचानक झोपेतून उठून अशी मागणी करणं योग्य नसल्याचं शिरसाट म्हणाले.