मुंबई : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित चित्रपटात अक्षय कुमार शिवसेनाप्रमुखांची भूमिका साकारणार का या प्रश्नावर अक्षय कुमारने सावध भूमिका घेतली.
या प्रश्नावर उत्तर देताना अक्षय म्हणाला की, मी या भूमिकेसाठी योग्य आहे का हे मला माहिती नाही, हा निर्णय निर्माता दिग्दर्शकांनी घ्यावा.
अक्षय ‘रुस्तम’ चित्रपटाच्या यशानंतर मीडियाशी बोलत होता. तो बाळासाहेब ठाकरेंच्या चरित्रपटात काम करणार का असा प्रश्न त्याला विचारण्यात आला होता. अक्षय म्हणाला, या भूमिकेसाठी मी योग्य आहे का हे मला माहिती नाही. या व्यक्तीरेखेसाठी मी योग्य आहे का याचा विचार चित्रपट बनवणार आहेत त्यांनी करावा.
यासाठी दुसरा कोणता कलाकार योग्य वाटतो असे विचारले असता अक्षय म्हणाला, त्याबद्दल मला सांगता येणार नाही. लोकांनी याचा विचार करावा, कारण तुम्ही बोलत आहात ती व्यक्ती खूप महान होती. त्यामुळे मला उत्तर देणे सोपे नाही. अक्षय कुमारच्या नावाची बाळासाहेब ठाकरेंच्या चरित्रपटासाठी चर्चा आहे. बाळासाहेबांचा नातू राहुल ठाकरे आणि त्यांची सून स्मिता ठाकरे या चरित्रपटाची निर्मिती करणार आहेत.
‘रुस्तम’ हा चित्रपट देखील चरित्रपटासारखाच आहे. १९५९ सालातील एका नेव्ही अधिका-याची गोष्ट यात मांडण्यात आली आहे. ‘रुस्तम’ चित्रपटाने पहिल्या तीन दिवसात ५० कोटीची कमाई केली आहे. अक्षय म्हणाला, लोकांचा ‘रुस्तम’ला चांगला प्रतिसाद पाहून बरे वाटले. कमाई किती होणार हे सांगण्यासाठी मी काही अंतर्यामी नाही. पण मी हे सांगू शकतो, सुरुवात चांगली झाली आहे. अक्षय कुमार आगामी ‘जॉली एलएलबी २’ आणि रजनीकांतच्या ‘रोबोट’ चित्रपटात काम करीत आहे.