मुंबई : अभिनेता सलमान खानच्या 2002 मध्ये झालेल्या वांद्रे 'हिट अॅन्ड रन' खटल्यात झालेल्या निर्दोष मुक्ततेला राज्य सरकारनं दिलेलं आव्हान सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयानं मंजूर केलंय.
2002 मध्ये सलमान खान प्रवास करत असलेल्या भरधाव गाडी खाली आल्यानं एकाचा मृत्यू झाला. तर आणखी चार जण जखमी झाले होते. याप्रकरणी सत्र न्यायालयानं 6 मे 2015 रोजी सलमानला सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यात दोषी ठरवून पाच वर्ष सक्त मजुरीची शिक्षा दिली. सलमाननं या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिलं. उच्च न्यायालयानं मात्र 10 डिसेंबर 2015 रोजी त्याची निर्दोष मुक्तता केली.
महाराष्ट्र सरकारनं यंदा 22 जानेवारीला सलमानच्या मुक्ततेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं. या प्रकरणाच्या फास्ट ट्रॅक सुनावणीची मागणीही राज्य सरकारनं केली होती. परंतु, ती फेटाळण्यात आलीय.
राज्य सरकारच्या याचिकेत 47 वेगवेगळ्या मुद्द्यांवर उच्च न्यायालयाच्या निर्णयावर आक्षेप घेण्यात आले आहेत. राज्य सरकारचे सर्वोच्च न्यायालयातले वकील निशांत कानटेश्वर आता याप्रकरणात सरकारची बाजू मांडणार आहेत. सलमानचा बॉडीगार्ड रवींद्र पाटीलनं दिलेला जबाब उच्च न्यायालयानं नामंजूर केल्यानं सलमानची सुटका झाली, असा राज्य सरकारचा प्रमुख युक्तीवाद आहे. रवींद्र पाटील हयात नसल्यानं त्याचा जबाब ग्राह्य धरणं योग्य नसल्याचं उच्च न्यायालयानं म्हटलंय.